21 व्या शतकातील पोलीस स्‍मार्ट आणि तंत्रज्ञानस्‍नेही असणे आवश्‍यक- राज्‍यपाल

Share this News:

पुणे, दिनांक 14- एकविसाव्‍या शतकातील महाराष्ट्राला 21 व्या शतकाच्या पोलिस दलाची आवश्यकता आहे, यासाठी आपल्या पोलिस दलाचे स्मार्ट व तंत्रज्ञानस्‍नेही पोलिस दलात रूपांतर करावे लागेल, असे प्रतिपादन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी केले.

येथील सिम्बायोसिस कॉलेजच्या सभागृहात पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध लोकाभिमुख उपक्रमांचे लोकार्पण राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते झाले. त्‍यावेळी ते बोलत होते. महाराष्‍ट्रातील प्रभावी पोलीस प्रशासनाच्‍या आकलन आणि अपेक्षांबद्दलचे सर्व्‍हेक्षण आणि सेवा व सुरक्षा बोध मानके यांचे राज्‍यपाल चे. विद्यासागर राव यांच्‍या हस्‍ते स्‍वतंत्रपणे लोकार्पण करण्‍यात आले. यावेळी पालकमंत्री तथा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, कामगार व पुनर्वसन राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे, खासदार अमर साबळे, खासदार गिरीश बापट, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, सिम्बायोसिसचे संस्थापक शां. ब. मुजुमदार, जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम आदी उपस्थित होते.

राज्‍यपाल म्‍हणाले, महाराष्ट्रात वृद्ध लोकांची संख्या सर्वाधिक आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या वैयक्तिक, आर्थिक, भावनिक सुरक्षा आणि सुरक्षिततेचा विश्‍वास निर्माण करणे हे एक मोठे आव्हान असेल. विविध आस्‍थापनांमध्‍ये महिलांच्या वाढत्या सहभागामुळे देशातील कार्यक्षेत्रांमध्ये वेगाने बदल होत आहेत. महिला वेगवेगळ्या रोजगारांच्‍या क्षेत्रात पुरुषांपेक्षा अधिक संख्‍येने आहेत, ही आनंदाची बाब आहे नजीकच्या काळात निमलष्‍करी दलात आणि सैन्य दलातही अधिक महिला असतील.

पोलिस आणि सर्व सार्वजनिक संघटनांनी महिला आणि वृद्ध लोकांसाठी संवेदनशील बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ते सामाजिक-आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी, व्यक्तींसाठी अधिक दयाळू असले पाहिजेत. पुण्यासारख्या आंतरराष्ट्रीय शहरातील परदेशी नागरिक आणि विद्यार्थ्यांकरिता पोलिस दल अत्यंत सभ्य आणि सहकारी वृत्‍तीचे असणे देखील आवश्यक आहे, असे राज्‍यपाल म्‍हणाले.

यापूर्वी महाराष्ट्र आणि विशेषतः मुंबई आणि पुणे या शहरांना दहशतवाद्यांनी लक्ष्य केले होते. असे हल्ले रोखण्यासाठी आपल्याकडे यंत्रणा असणे आवश्यक असल्याचे सांगून सोशल मिडीयाद्वारे होणा-या वाढत्‍या गुन्‍ह्यांबाबतही त्‍यांनी चिंता व्‍यक्‍त केली.

पालकमंत्री तथा महसूल मंत्री पाटील म्‍हणाले, पोलीस विभागाने सुरु केलेल्‍या या नवीन अभिनव उपक्रमांमुळे सर्वसामान्‍यांच्‍या मनात पोलिसांविषयी चांगली प्रतिमा निर्माण होण्‍यास मदत होणार आहे. सीमेवरील सैनिकांविषयी जनतेच्‍या मनात जशी आदरयुक्‍त प्रतिमा आहे, तशीच पोलिसांविषयी निर्माण होण्‍यासाठी प्रयत्‍न करण्‍याची अपेक्षाही त्‍यांनी व्‍यक्‍त केली. शासन पोलिसांना मदत करण्‍यास बांधिल असून पोलिसांच्‍या गृहप्रकल्‍पासाठी 25 कोटी रुपयांची मान्‍यता देण्‍यात आली आहे. तसेच जिल्‍ह्यातील नियोजन समितीच्‍यावतीने 5 कोटी रुपयांची तरतूद वाहतूक विषयकबाबीसाठी करण्‍यात आल्याचे त्‍यांनी सांगितले.

सिम्बायोसिसचे संस्थापक शां. ब. मुजुमदार यांनी पोलिस विभागाचे कौतुक करुन पोलीस आणि समाज यांच्‍यामधील दरी दूर होण्‍याची गरज प्रतिपादन केली.

कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक पोलीस आयुक्‍त डॉ. के. वेंकटेशम यांनी केले. पोलीस म्‍हणजे नम्र आणि कर्तव्यात कठोर अशी प्रतिमा कायम ठेवण्‍याची गरज प्रतिपादन करुन त्‍यांनी शहरी नक्षलवादाविरुध्‍द कठोरपणे कारवाई केल्‍याचे सांगितले. पोलिस विभागामार्फत नागरिकांना सुरक्षिततेची हमी देण्‍यासाठी सुरु केलेल्‍या विविध उपक्रमांचीही त्‍यांनी माहिती दिली. शहरात गेल्‍या 4 महिन्‍यापूर्वी 1300 सीसीटीव्‍ही कॅमेरे होते. नागरिक आणि विविध कंपन्‍या, संस्‍था यांच्‍या मदतीने आज शहरात 30 हजार कॅमेरे लावण्‍यात आल्‍याचे त्‍यांनी लक्षात आणून दिले. महाराष्‍ट्रातील प्रभावी पोलीस प्रशासनाच्‍या आकलन आणि अपेक्षांबद्दलचे सर्व्‍हेक्षण हे सिम्‍बॉयसिसच्‍या विद्यार्थ्‍यांनी केले आहे. पोलिसांनी नागरिकांना दिलेल्‍या सेवेनंतर नागरिकांचे समाधान झाले की नाही, त्‍यांच्‍या अपेक्षा काय होत्‍या, याबाबत सर्वेक्षण करण्‍यात आले,असेही त्‍यांनी सांगितले.

कार्यक्रमात पोलिस दलाच्‍या विविध विभागांचा गौरव राज्‍यपाल चे. विद्यासागर राव यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आला. कार्यक्रमास जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्यासह पोलिस व सनदी अधिकारी उपस्थित होते.आभार प्रदर्शन सह पोलीस आयुक्‍त रवींद्र शिसवे यांनी केले.

0000

Follow Punekar News: