कृषी क्षेत्राच्या संतुलित प्रादेशिक विकासात शेतीपूरक व्यवसायाची भूमिका महत्त्वपूर्ण : महादेव जानकर

Share this News:

नागपूर, दि. 10/8/2019 : कृषी क्षेत्रात संतुलित प्रादेशिक विकास साधत असताना शेतीपूरक व्यवसायांचे योगदान महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांनी शेतीसोबतच पूरक व्यवसायासाठी प्रोत्साहित करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपाद पशूसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्सव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी केले.

भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या वतीने अमरावती मार्गावरील संस्थेच्या मध्यप्रदेश, छत्तीसगढ, गोवा तसेच महाराष्ट्र राज्याची 25 वी क्षेत्रीय बैठकीसंदर्भात येथील डॉ. एस. पी. रायचौधरी सभागृहात आयोजित कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी कृषी संशेाधन आणि शिक्षण विभागाचे केद्रींय सचिव त्रिलोचल महापात्रा, भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे उपमहानिदेशक डॉ. के.अलगुसुंदरम, अतिरिक्त सचिव सुशील कुमार, आर्थिक सल्लगार बिंबाधर प्रधान, उपमहानिदेशक जयकृष्ण जेना, सहाय्यक महानिदेशक सुरेशकुमार चौधरी, निदेशक सुरेंद्रकुमार सिंग, प्रधान वैज्ञानिक नितीन पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.

कार्यशाळेला मार्गदर्शन करतांना महादेव जानकर म्हणाले, भारत देश हा कृषी प्रधान देश आहे. शेती हा देशाच्या आर्थिक व्यवस्थेचा कणा आहे. बहुतांश ग्रामीण भारताचा डोलारा पारंपरिक शेती आणि त्याच्या पूरक व्यवसायावर अवलबून आहे. पारंपरिक पूरक व्यवसाय त्या व्यवसायाच्या मर्यादा यामुळे शेतीला सहाय्य व्हावे तसेच याबाबत आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी राज्यशासन प्रयत्नशील आहे. कृषी व पशुवैद्यक क्षेत्राचा संतुलित प्रादेशिक विकास साधत असतांना कृषी व पशुवैद्यक क्षेत्रातील उद्योजकतेच्या संधी युवा पशुपालक,बेरोजगार तरूण व ग्रामीण महिलांसाठी उपलब्ध करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. मध्यप्रदेश, छत्तीसगढ गोवा तसेच महाराष्ट्र राज्याची भौगोलिक स्थिती वेगवेगळी असून येथील कृषी उत्पादने भिन्न आहेत. कृषी क्षेत्राचा विकास करण्यासाठी मृदा सर्वेक्षण, जलयुक्त शिवार सारख्या योजना राज्यात प्रभावीपणे राबवून कमी पाणी असणाऱ्या क्षेत्रात देखील दुबार पिके घेण्यात यश येत आहे. याच धर्तीवर फळे तसेच भाज्यांचे उत्पादन वाढीवर भर दिल्यास कृषी निर्यात क्षेत्रात वाढ निश्चित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

औदयोगिक विकासामुळे पर्यावरणातील प्रदुषण, वाढत्या लोकसंख्येचा भार, जलप्रदुषण तसेच शेत जमिनीत कीटकनाशकांचा वाढता वापर कृषी क्षेत्रासमोरील मोठे आव्हान आहे. यासाठी राज्य शासनाच्यावतीने शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. यासाठी शेतकऱ्यांनी केवळ शेतकी उत्पादनावर अवलंबून न राहता शेतीपूरक व्यवसायावर भर दयावा. तसेच कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण उपक्रम जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहचवावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाचे संचालन वैज्ञानिक डॉ. एस. चट्टराज तर आभार निदेशक डॉ. एस. के. सिंग यांनी मानले.

या कार्यशाळेत देश-विदेशातील कृषी तज्ज्ञ, अभ्यासक तसेच भारतीय अनुसंधान परिषदेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.