आंबेडकरी विचार दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना आम्ही घाबरणार नाही- आ. जितेंद्र आव्हाड
मुंबई – दि.23: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना समर्थन देण्याची परवानगी जर फर्ग्युसनसारख्या शैक्षणिक संस्थांमध्ये मिळत नसेल तर हा देश कुठल्या दिशेने चालला आहे? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला. आज फर्ग्युसन महाविद्यालयात आंदोलन करत असलेल्या आंबेडकरी विचारांच्या विद्यार्थ्यांना पाठींबा दर्शविण्यासाठी आव्हाड पुण्यात गेले होते. यावेळी तीन-चारशे जणांच्या जमावाने त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या घटनेने उद्विग्न झालेल्या आव्हाड यांनी याबाबत आपला निषेध व्यक्त केला.
यावेळी बोलताना आव्हाड म्हणाले मंगळवारपासून फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये आंबेडकरी विचारांचे मुलं-मुली हे आपले विचार दाबले जात असल्यामुळे आंदोलन करत आहेत. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पणतु सुजात आंबेडकर हादेखील आहे. सुजातच्या विचारांविषयी सहानुभूती दाखवण्यासाठी आव्हाड महाविद्यालयात गेले होते. सुजात आंबेडकर हा काही नक्षलवादी किंवा अतिरेकी नाही, त्याच्या नसांमध्ये या देशाच्या संविधानाचे रक्त वाहत आहे. त्याला भेटण्यामागे, समर्थन देण्यामागे आपली चूक काय होती? असा प्रश्न आव्हाड यांनी विचारला आहे. हल्ला करणाऱ्यांनी सुजात आंबेडकरबद्दलही अपशब्द वापरले. अशा संघी अविवेकी कार्यकर्त्यांना आम्ही घाबरणार नाही, असे सांगून आव्हाड यांनी या हल्ल्याबाबत निषेध व्यक्त केला. तसेच, अशा हल्ल्यांना न घाबरता आंबेडकरी विचार माननाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याने आता एक व्हावं, असे आवाहनही त्यांनी केले.