चारा डेपो उभारा अन्यथा गुरे मुख्यमंत्र्याच्या ‘वर्षा’ बंगल्यावर नेऊ.
– खा.सुप्रिया सुळे यांचा सरकारला इशारा
बारामती – दि.23 : राज्य व केंद्र सरकारला राज्यातील भीषण दुष्काळाचे गांभीर्यच नाही. टंचाईने होरपळणाऱ्या भागात चारा डेपो सुरू केले नाही तर बारामतीतील जनावरे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर नेऊन सोडू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारसुप्रिया सुळे यांनी आज बारामतीत दिला. येत्या दहा दिवसात सर्व शासकीय प्रक्रियांचे अडथळे दूर करुन टँकरने पाणीपुरवठा सुरू केले नाही, तर जिल्हाधिकारी कार्यालयावर बेमुदत उपोषण करण्याचा इरादाही सुळे यांनी आज जाहीर केला.
शेतकऱ्यांना कर्ज माफी, टँकरने पाणी पुरवठा, जानाई-शिरसाई उपसा सिंचन योजना, रोजगार हमी, दुष्काळी भागांमध्ये शंभर टक्के वीज बिल माफी, निराडावा कालव्याचे पाणी सोडणे, चारा डेपो व चारा छावण्या सुरू करणे, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक परीक्षा व प्रवेश शुल्क माफ करणे इत्यादी विविध मागण्यांसाठी आज बारामती येथे सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुप्रिया सुळे यांनी सरकारच्या निष्क्रियतेवर कडाडून टीका केली. या मोर्चामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे बारामती नगराध्यक्ष योगेश जगताप, तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी ‘भाजप सरकारचे करायचे काय खाली मुंडं वर पाय, ‘भाजप सरकार हाय हाय’ अशा घोषणांनी कार्यकर्त्यांनी हा परिसर दणाणून सोडला.
यावेळी केलेल्या आपल्या घणाघाती भाषणात सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. शेतकऱ्यांसोबतच आता व्यापारीही आत्महत्या करण्याची भाषा करू लागले आहेत असे सांगून सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘ज्या व्यापाऱ्यांनी मोठ्या विश्वासाने नरेंद्र मोदी यांना निवडून दिले तेच व्यापारी आज केंद्र शासनाच्या धोरणाच्या निषेधार्थ आत्महत्या करण्याची भाषा करतात आणि पंतप्रधान त्यांना भेटण्यासाठी साधी वेळ देत नाहीत हे दुर्दैवी आहे‘, असे त्या म्हणाल्या.
देशात कधी झाल्या नव्हत्या इतक्या आत्महत्या यंदा एकाच वर्षी या राज्यात झाल्या आहेत. विरोधी पक्षात असताना विद्यमान मुख्यमंत्री नेहमी म्हणायचे की एका जरी शेतकऱ्याने आत्महत्या केली तर सरकारविरोधात खूनाचे 302 कलम लावायला हवे, आता तुम्हीच हे कलम लावायला हवे नाही तर आम्ही हे कलम तुमच्यावर लावण्यासाठी पुढाकार घेऊ, असे सुळे यांनी सांगितले. राज्याच्या अनेक भागात दुष्काळाची यंदा जी स्थिती आहे त्याचा सरकारला अंदाजच नाही, अनेक मंत्रीही उपाययोजनांबाबत आग्रही आहेत, पण संवेदनशीलता दाखविण्याऐवजी दुष्काळातही सरकार राजकारण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे सुळे म्हणाल्या. तसेच यंदा टंचाईच्या स्थितीत ज्या ठिकाणी दुष्काळ आहे अशा भागातील मुलांकडून शिक्षणासाठी पैसे मागितले तर हे शुल्क भरू नका असेही त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. संपूर्ण वीजबिल व कर्जमाफी व्हावी अशी शेतकऱ्यांची अपेक्षा असून सरकार या बाबत गंभीर नाही असा घणाघाती आरोप सुळे यांनी केला. शेततळ्यासाठी ऑनलाईन अर्ज दाखल करण्याचा अजब फतवा काढण्यासोबतच टँकर मंजूरीसाठी पाच पानांचा फॉर्म भरण्याची व दहा अधिकाऱ्यांच्या सह्या घेण्याची काय गरज आहे, राज्य होरपळत असताना असला लाल फितीचा कारभार होणार असेल, तर तीव्र आंदोलन करु असा इशारा सुप्रिया सुळे यांनी दिला.