मावळचा मावळा पुन्हा एकदा जाणार लोकसभेत – आमदार मनोहर भोईर

Share this News:
पनवेल, 2 एप्रिल – मावळचा मावळा देशाच्या संसदेत सर्वाधिक प्रश्न उपस्थित करतो, सर्वाधिक उपस्थिती लावतो, ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. हा अभिमान जागा ठेवण्यासाठी मावळचा मावळा पुन्हा एकदा देशाच्या संसदेत जाणार आहे. त्या उमेदवाराला सर्वाधिक मताधिक्य मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न कारायचे आहेत, असे उरण विधानसभेचे आमदार मनोहर भोईर म्हणाले.
उरण शहर व ग्रामीण विभागातील महायुतीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) येथे घेण्यात आला. यावेळी आमदार भोईर बोलत होते. यावेळी शिवसेना-भाजप-रिपाइं-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे, पनवेल विधानसभेचे आमदार प्रशांत ठाकूर, उरण विधानसभेचे आमदार मनोहर भोईर, माजी खासदार रामशेठ ठाकूर, जेएनपीटीचे विश्वस्त रवी पाटील, महेश बालदी, दिनेश पाटील, सुधीर घरत, रायगड जिल्हा संपर्क प्रमुख जयवंत दळवी, नरेश रहालकर, उरण तालुका प्रमुख संतोष ठाकूर आदी उपस्थित होते.
आमदार मनोहर भोईर म्हणाले, “मराठी भाषेच्या संवर्धन आणि अभिजात भाषेचा दर्जा मिळविण्यासाठी संसदेत खासदार बारणे यांनी आवाज उठवला. देशाच्या संसदेत जो पक्ष दहा पेक्षा अधिक खासदार निवडून आणू शकत नाही, असे काहीजण देशाचे पंतप्रधान होण्याचे स्वप्न बघत आहेत. पण त्यांचे स्वप्न हे स्वप्नच राहणार आहे. पुन्हा एकदा नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होणार आहेत. तर मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे हेच होणार आहेत. विविध प्रकल्पांसह रेल्वेचे जाळे देखील विस्तारले आहे. पनवेल आंतरराष्ट्रीय विमानतळ होत असताना बधितांना तिप्पट जमीन किंवा मोबदला देण्यात आला आहे. अशी भरघोस कामे एनडीए सरकारने केली आहेत.”
खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, “केवळ घोषणा आणि आश्वासने दिली नाहीत, तर ती पूर्ण करण्यासाठी सतत प्रयत्न केले. अनेक प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत. त्याचा पाठपुरावा सातत्याने सुरू आहे. घारापुरी बेटावर आजवर कोणीही वीजपुरवठा करण्याचे धाडस केले नाही. ते काम एनडीए सरकारने केले. जेएनपीटी बाबतचे अनेक प्रश्न सोडवले. ज्या राष्ट्रवादीने सत्ता उपभोगत असताना संबंध महाराष्ट्र लुटला, तेच आज मत मागण्यासाठी पुन्हा एकदा आले आहेत. पण त्यांना आता जनतेने हद्दपार केले आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातून दीड लाखापेक्षा जास्त मताधिक्य घेऊन येणार आहे. मतदाराला जागरूक करून मतदानाचा आकडा वाढवावा, असे आवाहन बारणे यांनी केले.
माजी खासदार रामशेठ ठाकूर म्हणाले, “तपस्वी माणसाला साथ देण्यासाठी साध्या माणसाला देशाच्या संसदेत पाठवायचे आहे. खासदार बारणे यांची काम करण्याची वृत्ती अतिशय चांगली आहे. कोणताही माणूस त्यांच्याकडे गेला तर तो खाली हाताने येत नाही. यावेळी खासदार बारणे यांना उरण तालुक्यातून 30 हजारांचे मताधिक्य मिळेल. रस्ते, रेल्वे जाळे पसरत आहे. हे सरकार उरण, पनवेल भागासाठी जोमाने काम करत आहे. त्यामुळे या सरकारला विजयी करा, असे आवाहन रामशेठ ठाकूर यांनी केले.
दत्ता दळवी म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेसकडे प्रचाराचा मुद्दाच नाही, म्हणून ते भाजप – शिवसेनेच्या युतीबाबत बोलत आहेत. भाजप-शिवसेनेत वैचारिक भांडण होते. वैचारिक पातळीवर ते भांडण मिटल्याने पुन्हा दोन्ही पक्ष एकत्र आले. आता महायुतीचा विजय निश्चित आहे.”
जेएनपीटी चे विश्वस्त महेश बादील म्हणाले, “शेतकरी कामगार पक्ष आयत्या उमेदवारांच्या जीवावर राजकारण करते. स्वकर्तृत्वावर आपली पात्रता सिद्ध करणा-याला मत द्यायला हवं. राष्ट्रवादी काँग्रेसचा ग्रामपंचायत सदस्य सुद्धा सापडत नाही. मग त्यांचा खासदार कसा होईल, हा विचार करण्याचा भाग आहे. जेएनपीटी चा साधा रोडसुद्धा मागच्या सरकारला करता आला नाही. नरेंद्र मोदी पहिल्यांदा इथे आले आणि विकासकामांचे भूमिपूजन केले. आता त्याची कामे प्रगतीपथावर आहेत. काही अंतिम टप्प्यात आहेत. यामुळे इथे लाखो तरुणांना रोजगार उपलब्ध होईल. 150 कोटींचे मच्छीमार बंदर सुरू केले. त्याचबरोबर कोट्यवधींची कामे सुरू झाली. यामागे केवळ या सरकारची देण्याची दानत महत्वाची आहे. उरण तालुक्याचा विकास फक्त महायुतीच्या सरकारमुळेच झाला.”
दिनेश पाटील म्हणाले, “माणसं जोडणारा खासदार म्हणजे श्रीरंग बारणे. मावळ लोकसभा मतदारसंघाचा विकास म्हणजे श्रीरंग बारणे आहेत. कुठलीही जबाबदारी द्या, ती प्रामाणिकपणे पार पाडू. निवडणुकीच्या निकालात शिवसेनेचे शिवसैनिक आणि भारतीय जनता पक्षाचे चौकीदार आणि महायुतीचे कार्यकर्ते विजयी गुलाल उधळतील.”