युवा कार्यकर्त्यामुळेच पक्षाला घवघवीत यश – प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील
23/8/19 : केंद्र आणि राज्य स्तरावर भारतीय जनता पार्टीची व्याप्ती वाढविण्यात भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचा महत्वाचा भाग आहे. युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी धडाडीने काम केल्यानेच पक्षाला केंद्र आणि राज्य स्तरावर घवघवीत यश मिळाले आहे, असे मत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय चंद्रकांत दादा पाटील यांनी शुक्रवारी पुण्यात व्यक्त केले.
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या कार्यकारिणीची शुक्रवारी पुण्यात बैठक आयोजित करण्यात आली होती. माननीय चंद्रकांत दादा पाटील यांनी यावेळी प्रमुख मार्गदर्शन केले.
माननीय चंद्रकांत दादा पाटील यावेळी म्हणाले की, सध्या सुरू असलेल्या मतदार नोंदणीतही युवा मोर्चा चांगले काम करत आहे. पुराच्या काळात युवकांनी चांगले काम करून सामाजिक बांधिलकीचा आदर्श प्रस्थापित केला आहे, अशी पावती पाटील यांनी दिली.
राजकारणात काम करत असताना सखोल ज्ञान पाहिजे. आगामी काळात अधिकाधिक जनसंपर्क वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. पक्षाची तत्वे समजून घ्यावीत. कामांचे नियोजन करावे, असे आवाहन पाटील यांनी यावेळी केले.
या मेळाव्याला पुण्याचे सहपालक मंत्री संजय भेगडे, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आमदार योगेश टिळेकर, पुण्याच्या शहराध्यक्ष माधुरी मिसाळ, आमदार भीमराव तापकीर आदी उपस्थित होते.