अणुचाचण्यांप्रमाणे ३७० कलमाला पूर्णविराम देऊन भारताचा जगाला संदेश : विनय सहस्त्रबुद्धे  

Share this News:

पुणे, 18/8/2019: भारताने सन १९७४ मध्ये इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात आणि सन १९९८ मध्ये अटबिहारी वाजपेयी यांच्या काळात अणुचाचणी केली होती. त्यानंतर आता सन २०१९ मध्ये नरेंद्र मोदी यांच्या काळात ३७० कलमाला पूर्ण विराम देऊन अणू चाचणी नाही, मात्र प्रखर संदेश जगाला दिला आहे. पहिल्या दोन अणुचाचण्यांप्रमाणे ३७० कलमाविषयीचा संदेश जगाला गेला असून स्वदेश रक्षण हाच बाजीराव पेशव्यांप्रमाणे आपला उद्देश होता, असे मत भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी व्यक्त केले.

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या ३१९ व्या जयंतीनिमित्त थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा थोरले बाजीराव पेशवे शौर्य पुरस्कार भारत सरकारचे माजी मुख्य वैज्ञानिक सल्लागार पद्मविभूषण डॉ. राजागोपाला चिदंबरम यांना न्यू इंग्लिश स्कूल च्या टिळक रोड सभागृहात झालेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.
खासदार गिरीष बापट, आमदार मेधा कुलकर्णी, उदय सिंह पेशवा, अनिरुद्ध देशपांडे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), सचिव कुंदनकुमार साठे, अनिल गानू आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. सन्मानचिन्ह, पेशवाई पगडी, २५ हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप होते. पुरस्कार वितरण सोहळ्याचे यंदा ५ वे वर्ष आहे. यावेळी डॉ. राजगोपाला चिदंबरम यांनी आण्विक संदर्भातून राष्ट्रीय विकास आणि राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर मार्गदर्शन केले.
विनय सहस्त्रबुद्धे म्हणाले, परदेशात बाजीराव पेशवे यांच्या युद्धनितीचा अभ्यास केला जातो. मात्र, आपल्याकडे वीरांची उपेक्षा होत असून ती थांबविणे गरजेचे आहे. वीरांचे स्मारक होणे, आठवण ठेवण्याकरीता कार्यक्रम करणे हे जरी आवश्यक असले, तरी बाजीराव पेशवे यांच्या रणनिती अभ्यासाविषयी साक्षरता होणे आवश्यक आहे. देशाचे गृहमंत्री अमित शहा हे बाजीराव पेशवे यांचे चरित्र विविध भाषांत उपलब्ध व्हावे आणि त्यांचे स्मारक व्हावे, यासाठी आग्रही आहेत. त्यामुळे लवकरच हे स्वप्न साकार होईल.
डॉ.राजागोपाला चिदंबरम म्हणाले, कोणत्याही देशाचा विकास हा संरक्षणाविना आणि संरक्षण हे विकासाविना होणे अर्थहिन आहे. आपल्या देशाचा विकास झपाटयाने होत असला, तरी देखील सुरक्षेच्या दृष्टीने आपण सर्तक असणे आवश्यक आहे. केवळ शस्त्रास्त्र संपन्न किंवा संरक्षण शास्त्रापुरते नाही, तर उर्जा, पाणी आणि वातावरणाविषयी संरक्षण असणे गरजेचे आहे. आजच्या काळात सायबर सिक्युरिटी देखील अत्यावश्यक आहे. भारत संरक्षणासोबतच विकासही करीत असून नव्या तंत्रज्ञानाची ओळख देशाला करुन देणारा आपला देश असावा, ही आपली इच्छाशक्ती प्रबळ असल्याचेही त्यांनी सांगितले.
उदयसिंग पेशवा म्हणाले, बाजीराव पेशवे हे स्वामीभक्त आणि आज्ञाधारक होते. चपळ हालचाली हे त्यांचे वैशिष्टय होते. ज्यांनी मराठेशाहीचे रक्षण केले. त्या कुटुंबाविषयी मागील काही वर्षात वाईट उद््गार काढले गेले, हे खेदजनक आहे. पुण्यामध्ये नद्यांवरील अनेक पूल देखील त्यांनी बांधले, तरी देखील एकाही पूलाला त्यांचे नाव नाही. त्याची दखल घेण्याची आवश्यकता आहे, असेही त्यांनी सांगितले. गिरीष बापट, भूषण गोखले यांनी मनोगत व्यक्त केले. रवींद्र खरे यांनी सूत्रसंचालन केले. श्रीकांत नगरकर यांनी आभार मानले.

पुणे रेल्वे स्थानकाला थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव द्यावे 
भारतातील विविध क्षेत्रात शौर्य गाजविलेल्यांचा सन्मान प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी केला जातो. बाजीराव पेशवे यांची स्मृती जागविणे हा यामागील उद्देश आहे. त्यामुळे पुणे रेल्वे स्थानकाला थोरले बाजीराव पेशवे असे नामकरण करावे आणि शौर्याचे प्रतिक असलेल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये त्यांचा पुतळा बसवावा, अशी मागणी यावेळी प्रतिष्ठानचे सचिव कुंदनकुमार साठे यांनी केली.