सीएनजी बसेसचा मोठ्या प्रमाणात प्रसार व्हायला हवा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे मत

Share this News:
पुणे : पेट्रोल डिझेलमुळे होणारे प्रदुषण टाळता येईल यासाठी अनेक नवनवीन साधने आली आहेत. पुण्या-मुंबईसारख्या शहरांमध्ये या बॅटरी आॅपरेटेड गाड्या वापरल्या पाहिजेत. विविध ठिकाणी त्याचे चार्जिंग स्टेशन्स ठेवायचे. मुंबईतील १० टक्के गाड्या बॅटरीवर चालल्या तर साधारण ५० टक्के बचत होईल. पेट्रोल-डिझेलला लागणारे पैसे आणि बॅटरी आॅपरेटेड गाड्यांना लागणारे पैसे यामध्ये नक्कीच फरक आहे. तसेच सीएनजी गॅसच्या बाबतीत देखील आहे. रिक्षा, महानगरपालिकेच्या बसेस या सीएनजी असाव्या, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर होणारे प्रदुषण टळेल, असा सिएनजीचा प्रयत्न आहे. सिएनजी बसेसचा मोठ्या प्रमाणात प्रसार व्हायला हवा. आपल्याला बचत आणि पर्यावरणाच्या दृष्टीने अशा मार्गांनी जावे लागेल, असे मत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडच्यावतीने सीएसआर उपक्रमांतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला २ सीएनजी बसेस देण्यात आल्या या बसेसचा लोकार्पण सोहळा विद्यापीठाच्या परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झाला. यावेळी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या बसेस सूपूर्त करण्यात आल्या. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ. नितीन करमळकर, एमएनजीएलचे वाणज्यिक संचालक संतोष सोनटक्के, एमएनजीएलचे व्यवस्थापकीय संचालक सुप्रियो हलदर, स्वतंत्र संचालक राजेश पांडे आणि दीपक मुकादम, प्रसेनजित फडणवीस उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले, एमएमजीएलने दोन बसेस सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला दिल्या आहेत, ज्यामध्ये पेट्रोल डिझेल वापरले जाणार नाही तर गॅसचा वापर होणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कॅम्पस खूप मोठे आहे. त्यामुळे कॅम्पसमध्ये फिरण्यासाठी होणारी गैरसोय या बसेसमुळे दूर झाली आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे या बसेस सीएनजी गॅसवर चालणा-या बसेस आहेत. विद्यापीठ ही देखील छोटी ग्रीन सिटी आहे. ही संरक्षित करण्यासाठी या बसेसचा फायदा होणार आहे.प्रा.डॉ. नितीन करमळकर म्हणाले, काही वर्षांपूर्वी विद्यापीठात बसेस आतपर्यंत येण्याची सोय होती. परंतु या बसेसमुळे विद्याथर््यांची होणारी गैरसोय दूर होणार आहे. तसेच या सीएनजी बसेस असल्याने प्रदुषण होणार नाही. एम. एन. जी. एल च्या मदतीने घेतलेला हा ग्रीन इनिशिएटीव्ह आहे.

सुप्रियो हलदर म्हणाले, पुण्याला ग्रीन आणि स्मार्ट सिटी बनविण्यासाठी प्रत्येकाने पुढे यायला हवे. महाराष्ट्र नॅचरल गॅसच्या माध्यमातून आम्ही पुणे शहराला पर्यावरणपूरक बनविण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आवाहनाला अनुसरुन महिलांसाठी देखील एक सीएनजी बस देण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
राजेश पांडे म्हणाले, प्रत्येक गोष्ट सरकारने केली पाहिजे, असे नाही. तर काही गोष्टींमध्ये समाजाचा सहभाग देखील महत्त्वाचा आहे. विद्यापीठाचा परिसर हिरवागार आहे. त्यामुळे तो परिसर असाच रहावा याकरिता सीएनजी बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत.
संतोष सोनटक्के म्हणाले,  विद्यापीठाचा परिसर पर्यावरणपूरक करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सोईसाठी या बसेस उपयुक्त ठरणार आहेत. या मुळे विद्यापीठाचा परिसर प्रदूषणमुक्त राहण्यास मदत होईल. विद्यापीठाचा परिसर ४०० एकर असून विद्यापीठात प्रवास करण्यासाठी  सदर बसेस उपयुक्त ठरणार आहेत.