कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्पोरेट क्षेत्राने सामाजिक उत्तरदायित्व निधीतून व इतर माध्यमातून मदत करावी : विजय वडेट्टीवार यांचे आवाहन
मुंबई दि . 21/03/2020 : राज्यातील संकटांवेळी कार्पोरेट क्षेत्र नेहमीच मदतीसाठी पुढे आले आहे. यावेळीही कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी व बाधित व्यक्तींसाठी विलगीकरण कक्ष निर्माण करणे व त्या अनुषंगाने अन्य कामांसाठी कार्पोरेट क्षेत्राने सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (सीएसआर) व इतर माध्यमांतून मदत करावी, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.
श्री. वडेट्टीवार म्हणाले, राज्यातील कार्पोरेट क्षेत्राने नेहमीच राज्यावर येत असलेल्या प्रत्येक संकटांवर मात करण्यासाठी मदत केली आहे. सध्या देशात व राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशावेळी शासन सर्व स्तरावर प्रयत्न करत आहे. सर्व क्षेत्रातील लोक सहकार्य करीत आहेत त्याचप्रमाणे अशा आपत्तीवेळी कार्पोरेट क्षेत्राने सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (CSR )व इतर माध्यमातून मदत करावी.
ही मदत कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी बाधित झालेल्या व्यक्तींसाठी विलगीकरण कक्ष स्थापन करणे, तात्पुरती निवासी व्यवस्था करणे, अन्न, कपडे वैद्यकीय देखभाल, नमुने गोळा करण्यावरील खर्च तपासणी/छाननीसाठी सहाय्य, कॉन्टक्ट ट्रेसिंग शासनाच्या अतिरिक्त चाचणी प्रयोगशाळा स्थापन करण्याचा खर्च व उपभोग्य वस्तू, अग्निशमन, पोलीस, स्थानिक स्वराज्य संस्था व आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक संरक्षणासाठी प्रतिरोधक साधनांचा खर्च व व्हेंटीलेटर, हवा शुद्धीकरण यंत्र, थर्मल स्कॅनर्स व इतर साधनांसाठी खर्च करणे यासाठी असेल, असेही श्री. वडेट्टीवार म्हणाले.