‘दगडूशेठ’ गणपतीची प्राणप्रतिष्ठापना आणि मिरवणूक थाटात
पुणे 2/9/2019 : मंगलमूर्ती मोरया… गणपती बाप्पा मोरया… जय गणेशच्या जयघोषात शेषात्मज रथातून निघालेल्या दिमाखदार आगमन मिरवणुकीने वाजत गाजत श्री गणेश सूर्यमंदिरात दगडूशेठचे गणपती बाप्पा विराजमान झाले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १२७ व्या वर्षानिमित्त आयोजित उत्सवाचा प्रारंभ हजारो भक्तांच्या साक्षीने झाला. श्री गणेश सूर्यमंदिरात सकाळी ११ वाजून १० मिनिटांनी शिर्डी कोकमठाण येथील प.पू.विश्वात्मक ओम गुरुदेव जंगलीदास महाराज यांच्या हस्ते विधीवत श्रींची प्राणप्रतिष्ठापना झाली.
यावेळी श्री क्षेत्र काशीपीठाचे जगद््गुरु श्री. श्री. श्री. १००८ डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी, ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, महेश सूर्यवंशी, सुनील रासने, उत्सवप्रमुख व नगरसेवक हेमंत रासने, माणिक चव्हाण, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांसह कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
मुख्य मंदिरापासून सकाळी ८.३० वाजता श्रीं च्या आगमन मिरवणुकीला प्रारंभ झाला. श्रीं ची विलोभनीय मूर्ती डोळ्यात साठविण्यासोबतच दर्शनासाठी भक्तांनी चौका-चौकात गर्दी केली. मंदिरापासून निघालेल्या मिरवणूक तांबडी जोगेश्वरी मंदिर, अप्पा बळवंत चौक, नगरकर तालीम चौक, शनिपार चौक, टिळक पुतळा मंडई मार्गे उत्सव मंडपात आली. मिरवणुकीमध्ये अग्रभागी देवळणकर बंधूंचा चौघडा, गायकवाड बंधू सनई, प्रभात बँड, मयूर बँड, दरबार बँड यांसह चिंचवड गाव येथील गंधाक्ष वाद्यपथक देखील सहभागी झाले होते. मुख्य पूजा मिलींद राहुरकर गुरुजी यांच्या पौरोहित्याखाली झाली.
अशोक गोडसे म्हणाले, यंदाच्या मंदिराच्या प्रतिकृतीची साकारण्यात आलेली संकल्पना भारताच्या प्राचीन वेद, पुराणे, शास्त्रे यावर आधारित आहे. उंच शिखरे, मंडप असलेले हे सूर्यमंदिर आहे. सूर्याच्या प्रभात, माध्यान्य आणि सायंकालीन अवस्थांचे मनोहारी दर्शन तसेच १२ आदित्य आणि सूर्यास प्रिय असलेल्या कमल, पुंडरिक आणि उत्पालांच्या लता-वेलींच्या डौलदार नक्षींनी व्यापलेले मंदिर भाविकांना यंदा पाहता येणार आहे. अनेक स्तंभ, मालांची तोरणे आणि सिंह, कीर्तिमुख, हंस, यक्ष, सुरसुंदरी आणि आकाशगामी गंधर्वांनी मंदिर सजविले आहे. सोन्यासारख्या प्रकाशाने व्यापलेले मंदिर गजांत लक्ष्मीने नटलेले आहे. समृद्धीचे प्रतिक असलेले हत्ती, अरुणाच्या सारथ्याने प्रचंड सूर्यरथाचे धावणारे अश्व व रथचक्र हे देखील आहेत. मंदिराच्या प्रतिकृतीमध्ये अनेक स्तंभी पद्मपीठाच्या सुवर्णी सिंहासनावर श्रीं ची मूर्ती विराजमान झाली आहे. तरी भाविकांनी दर्शनाच लाभ घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.
ॠषिपंचमीनिमित्त २५ हजार हून अधिक महिला करणार सामुदायिकरित्या अर्थवशीर्ष पठण
ॠषिपंचमीनिमित्त दरवर्षीप्रमाणे मंगळवार, दिनांक ३ सप्टेंबर रोजी पहाटे ६ वाजता २५ हजार हून अधिक महिला सामुदायिकरित्या अर्थवशीर्ष पठण करणार आहेत. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गो-हे, परिमंडळ १ च्या पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच रात्री १० ते पहाटे ३ वाजेपर्यंत समस्त वारकरी बंधूंतर्फे वारकरी जागर कार्यक्रम करण्यात येणार असल्याचे ट्रस्टतर्फे सांगण्यात आले.