सैनिकी अभियांत्रिकी सेवेतली 9304 पदे रद्द करण्यास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मान्यता

Rajnath Singh
Share this News:
नवी दिल्ली, 7 मई 2020: मूलभूत आणि औद्योगिक कार्यदलामध्ये सुघारणा करण्यासाठी एमईएस म्हणजेच सैनिकी अभियांत्रिकी सेवेतली 9300 पेक्षा जास्त पदे रद्द करण्याच्या प्रस्तावाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मान्यता दिली. सशस्त्र दलाच्या संरक्षण खर्चामध्ये संतुलन राखण्यासाठी आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी कोणत्या उपाय योजना करणे आवश्यक आहे, हे पाहण्यासाठी लेफ्टनंट जनरल शेकाटकर यांच्या अध्यक्षतेखाली एक तज्ञांची समिती नियुक्त करण्यात आली होती. या समितीने केलेल्या शिफारसी लक्षात घेवून सैनिकी अभियांत्रिकी सेवेतली ही पदे रद्द करण्यात आली आहेत.

तज्ञांच्या समितीने केलेल्या शिफारसींनुसार सैनिकी अभियांत्रिकी सेवेच्या कार्यविभाजनाची फेररचना करण्यात आली असून आता अशंतः कामे विभागातल्या कर्मचारी वर्गांकडून करून घेण्यात येणार आहेत; तर जी  कामे बाहेरून करून घेतली जावू शकतात, ती पदे ठेवण्याची आवश्यकता नाही.  लेफ्टनंट जनरल शेकाटकर समितीने केलेल्या शिफारसींप्रमाणे मूलभूत आणि औद्योगिक कर्मचारी वर्गाच्या एकूण 13,157 पदांपैकी 9,304 पदे रद्द करण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे.

सैनिकी अभियांत्रिकी सेवा म्हणजे भक्कम कार्यदलासह प्रभावी संस्था बनवण्याची गरज आहे. तसेच आगामी अडचणीच्या काळामध्ये गुंतागुंतीच्या समस्या हाताळण्यासाठी संस्था अधिकाधिक कार्यक्षम असणे आवश्यक आहे, तसेच खर्चही कमी करणे गरजेचे आहे; याचा विचार करून समितीने या सुधारणा करण्याची शिफारस केली आहे.