दिव्यांग बालगोविंदांनी फोडली ‘आपली दहिहंडी’
पुणे 24/8/2019 : गोविंदा आला रे आला…मच गया शोर सारी नगरी रे…गोविंदा रे गोपाळा….या गाण्यांवर त्यांचेही पाय थिरकले आणि त्यांनी देखील चक्क सामान्यांप्रमाणे थरावर थर रचत दहीहंडी फोडली. शारिरीक व्यंगत्व असूनही कसबा पेठेतील दहीहंडीच्या उत्सवात वानवडी येथील अपंग कल्याणकारी संस्थेतील दिव्यांग बालगोपाळ सहभागी होत जल्लोषात दहीहंडी उत्सव साजरा केला.
शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीतर्फे कै.सौ.प्राची प्रकाश काळे स्मरणार्थ आपली दहीहंडी आणि माता यशोदा सन्मान सोहळ्याचे आयोजन कसबा पेठेतील माणिक चौकाजवळील अमेय सोसायटीच्या आवारात करण्यात आले होते. यावेळी सोफोश संस्थेतील सेविका पुष्पाताई भिसे यांचा यशोदा माता सन्मान देऊन गौरवही करण्यात आला. कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक पुरस्कार निवड समितीच्या सदस्या जयश्री देशपांडे, शाहीर हेमंतराजे मावळे, प्रा.संगीता मावळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे यंदा १८ वे वर्ष आहे.
शाहीर हेमंतराजे मावळे म्हणाले, केवळ परमेश्वराची पूजा करण्यापेक्षा श्रीकृष्णाच्या ज्या लिला आहेत, त्या समजून घेत त्याप्रमाणे आपल्याला आचरण करता येईल का, याचा विचार प्रत्येकाने करायला हवा. स्वत: राजा असूनही ज्या श्रीकृष्णाने अगदी सामान्य लोकांशी मैत्री करुन अन्न, वस्त्र, निवा–याची काळजी केली. त्याप्रमाणे आपणही कार्य करायला हवे, असेही त्यांनी सांगितले. शिवभूषण निनादराव बेडेकर यांच्या स्मरणार्थ स्वरगोकुळ हा विश्वेश सरदेशपांडे यांचा गायनाचा कार्यक्रम झाला. मॉडर्न कॉलेज आॅफ आर्टस्, सायन्स अँड कॉमर्स (डब्ल्यू.सी.बी.एस.) यांनी कार्यक्रमाला सहकार्य केले.