जुन्नर न्यायालयात बाबा रामदेव यांच्या विरोधात तक्रार दाखल

Ramdev Baba Coronil
Share this News:
जुन्नर, दि. 29/6/2020:   कोरोनाबाधित व्यक्तीवर पंतंजलीने तयार केलेल्या कोरोनील औषधाने उपचार केल्यास ती व्यक्ती पूर्णपणे 100% बरी होऊन कोरोनामुक्त होते असा भ्रामक दावा पत्रकार परिषद घेऊन करणाऱ्या बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांविरोधात आता जुन्नर येथील प्रथमश्रेणी न्यायालयात फौजदारी तक्रार दाखल करण्यात आली आहे. कोणत्याही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता औषध तयार करून विक्रीस उपलब्ध करणे या सगळ्या प्रक्रियेत बेकायदेशीरता व फसवणूक असल्याने न्यायालयात तक्रार दाखल केल्याचे तक्रारदार मदन कुऱ्हे यांनी सांगितले.
कोरोना विषाणू विरोधातील औषध शोधून काढल्याचा रामदेव बाबाच्या दाव्याविरोधात महाराष्ट्रात दाखल झालेली ही पहिलीच केस असून मदन कुऱ्हे या विधी अभ्यासकाने अॅड.असीम सरोदे यांच्या मार्फत ही न्यायालयीन तक्रार दाखल केली आहे.
कोणत्याही क्लिनिकल चाचण्या न घेता तसेच आयसीएमआर व आयुष मंत्रालयाची कोणतीही परवानगी न घेता, ‘कोरोनील व स्वासारी’ औषधांची उपयुक्तता वैज्ञानिक दृष्टीकोणातून सिद्ध न करता थेट औषध बाजारात विक्रीसाठी आणणे या रामदेव बाबा यांच्या कृतीतून ते स्वतःला कायद्यापेक्षा वरचढ समजतात, या देशात आपण काहीही करू शकतो ही गुर्मी म्हणजे कायदे न मानणारे नागरिक असल्याचे द्योतक आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 120(ब), 270, 504, 34, तसेच ‘ड्रग्स अँड मॅजिक रेमेडीज (आक्षेपार्ह जाहिरात) कायदा 1954’ कायद्यातील कलम 3 व कलम 4 व 5 ,रोगाचा संसर्ग वाढविणारी कृती रोखणारा कायदा, आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार काढण्यात आलेले नोटिफिकेशन यातील तरतुदींचे स्पष्ट उल्लंघन करणारी बेकायदेशीर कृती बाबा रामदेव, आचार्य बाळकृष्ण आणि पतंजली ने केली असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. आपण करतो त्या कृतीमुळे अनेकांचे नुकसान होऊ शकते, आपली कृती बेकायदेशीर आहे याची माहिती रामदेव बाबा आणि आचार्य बाळकृष्ण या व्यापाऱ्यांना नसेल असे नाही. कोरोना काळात सामान्य माणसांच्या मनातील भीतीचा फायदा पैसा कमविण्यासाठी होऊ शकतो याची पक्की माहिती असलेल्यांनी आपसात संगनमताने केलेले हे कृत्य असल्याचा आरोप तक्रारीतून केल्याचे अॅड.असीम सरोदे यांनी सांगितले.
21 एप्रिल रोजी आयुष्य मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना, कोविड-19 संदर्भात औषध शोधल्याचे दावे करू नये असे केंद्रीय गृह मंत्रालयाने 24 मार्च 2020 रोजी जाहीर पत्रक काढले या अनेक कायदेशीर सूचनांचा देखील बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांनी अपमान केला आहे. त्यामुळे त्या दोघांविरोधात नोटीस जारी करावी, त्यांच्या विरोधात योग्य ती कायदेशीर कार्यवाही करून दोषी आढळल्यास त्यांना शिक्षा सूनवावी अशा मागण्या तक्रारीत करण्यात आलेल्या आहेत असे मदन कुऱ्हे म्हणाले.
तक्रार दाखल करताना जुन्नरच्या स्थानिक न्यायालयात ऍड. सुदर्शन पारखे यांनी तक्रारदाराला मदत केली. जुन्नर न्यायालयात राष्ट्रीय महत्वाच्या सामाजिक न्याय विषयावर दाखल झालेली ही पहिलीच केस असल्याने कायदेक्षेत्रातील लोकांनासुद्धा या केसच्या सुनावणी बाबत उत्सुकता आहे.