पुलावरुन पाण्यात उडी मारलेल्या इसमास अग्निशमन जवानाकडून जीवदान
10 /9/19, पुणे – शहर परिसरात गणपतीच्या काळात खडकवासला धरणातून रोजच पाण्याचा विसर्ग कमी जास्त होत आहे. आज दुपारी विसर्ग नऊ हजार असताना बारा नंतर एका 45 वर्षाच्या इसमाने डेक्कन जवळील म्हात्रे पुलावरुन अचानक खाली पाण्यात उडी मारली. त्यानंतर लगेचच गणपती विसर्जना निमित्त विविध घाटांवर बंदोबस्ता करिता असलेले अग्निशमन दलाचे जवान व जीवरक्षक यांना नागरिकांनी आवाज देत घटना सांगितली.
तिथे गरवारे विसर्जन घाटावर बंदोबस्ताला असलेले अग्निशमन दलाचे जवान जितेंद्र कुंभार यांनी तातडीने पाण्याकडे धाव घेतली असता सदर इसम हा म्हात्रे पुलाकडून गरवारे पुलाच्या दिशेने हात पाय मारत जीवाच्या भितीने येताना दिसला. त्याचवेळी जवान कुंभार यांनी प्रकाश काची व अमोल गायकवाड या दोघा जीवरक्षकांच्या मदतीने पाण्यात मधोमध त्याच्या दिशेने दोर फेकला. दोर जवळ येताच त्या इसमाने दोर पकडला व तो दोर जवान व जीवरक्षक यांनी ओढून त्या इसमास सुखरुप पाण्याबाहेर काढले आणि त्याचा जीव वाचविला. सदर इसमास उडी मारण्याचे कारण विचारले असता तो काही सांगण्याच्या मनस्थितीत नसल्याचे जाणवले.
याबाबत जवान जितेंद्र कुंभार म्हणाले, “याचे आम्ही प्राण वाचविले व यामधे जीवरक्षकांनी मदत केली. त्या इसमास पोहता येत होते असे प्राथमिक निदर्शनास आल्याने आम्ही दोर टाकला. अन्यथा मी व जीवरक्षक यांनी पाण्यात उतरुन त्याला वाचविण्याचा प्रयत्न केलाच असता. त्या इसमाचे बंधूना संपर्क करुन सदर इसमास आम्ही त्यांच्याकडे दिल्याचे ही कुंभार यांनी सांगितले.” कर्तव्य बजावत जवान कुंभार व जीवरक्षकांनी केलेल्या कामगिरीचे कौतुक नागरिकांनी केले.