मांजरी गाव शंभर टक्के कोरोनामुक्त करण्यावर भर द्या -जिल्हाधिकारी नवल किशोर राम

Ram Naval Kishore

Support Our Journalism Contribute Now

पुणे, दि. 11-07-2020 :- शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असून तो रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने शासनाने घालून दिलेल्या नियमांची कडक अंमलबजावणी करुन मांजरी बुद्रुक गाव शंभर टक्के कोरोनामुक्त करण्यासाठी भर द्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केल्या.

हवेली तालुक्यातील मांजरी बुद्रुक येथील कृष्णाजी खंडूजी घुले विद्यालयात कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला आमदार चेतन तुपे, उप विभागीय अधिकारी सचिन बारावकर, तहसीलदार सुनील कोळी, गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के, हडपसर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रमेश साठे, सहायक पोलीस निरीक्षक मनोज पाटील, सहायक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन खरात, वैद्यकीय अधिकारी डॉ. मनिषा देशपांडे, सरपंच शिवराज घुले, उपसरपंच सुवर्णा कामठे, ग्रामसेवक मधुकर दाते, समन्वयक ए.बी.मोरे उपस्थित होते.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले, पुणे जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मोठया प्रमाणत वाढत आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन उपाययोजना करत आहे. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने मांजरी बुद्रुकच्या गावपातळीवरील प्रशासकीय यंत्रणेने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शासनाने घालून दिलेल्या नियमांची कडक अंमलबजावणी केली पाहिजे. गावात कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्यास त्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांचा ताबडतोब शोध घेऊन त्यांची यादी तयार करुन त्यांना नमुना तपासणीसाठी लॅबला पाठविण्यात यावे. नमुना तपासणी अहवाल आल्यानंतर निगेटिव्ह अहवाल असणाऱ्यांना होम क्वॉरन्टाईनचा शिक्का मारुन घरी पाठविण्यात यावे.

कोरोना बाधित गंभीर रुग्णांसाठी लोणी काळभोर येथील विश्वराज रुग्णालयात जास्तीत जास्त व्हेंटीलेटर बेड व आयसीयु बेड च्या व्यवस्थेबाबतचे लवकरात लवकर नियोजन करावे. यासाठी जिल्हा प्रशासन आवश्यक ती मदत करेल. कोरोना बाधित रुग्णामुळे इतरांना प्रसार होणार नाही याची काळजी घ्यावी. क्वॉरन्टाईन असणाऱ्यांची रोजच्या रोज ऑक्सीमीटरव्दारे तपासणी करावी. परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही, याची दक्षता घ्यावी. गावात जर कोणी नियम पाळत नसेल तर त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे. गावपातळीवरील प्रशासकीय यंत्रणांनी गावातील कोरोना विषयक आकडेवारी रोजच्या रोज अद्ययावत करुन ठेवली पाहिजे. तसेच या गावच्या प्रतिबंधित क्षेत्राकडे विशेष लक्ष द्यावे. कोरोना प्रतिबंधासाठी मांजरी गावासाठी मास्क, सॅनिटायझर इत्यादी साहित्याची आवश्यकता असल्यास ताबडतोब जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव सादर करावा. प्रशासन सर्वेतोपरी सहकार्य करेल. गावपातळीवर कोरोना विषयक जनजागृती करण्यावर भर द्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी राम यांनी दिल्या.

आमदार चेतन तुपे म्हणाले, शेतकऱ्यांना व्यवसायासाठी मार्केट कमिटीमध्ये जागा दिली तर चांगले होईल. कोरोना प्रतिबंधासाठी आपण सर्वजण मिळून चांगले काम करु. कोरोना बाधितांच्या संपर्कात येणाऱ्यांचा शोध घेण्यावर भर दिला पाहिजे, यामुळे मांजरी गाव निश्चित शून्यावर येईल, असेही ते म्हणाले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.

Punekar News is now on Telegram. For the latest Pune, Pimpri Chinchwad PCMC news, Like our Facebook Page, follow on Twitter and Instagram and also subscribe to Punekar News on Telegram.