शिवजयंती निमित्त घाटकोपरमध्ये शिवरथ यात्रेवर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी

घाटकोपर ता.२३- शिवजयंती उत्सव समिती-घाटकोपर आयोजित “एक घाटकोपर, एक भव्य शिवरथ यात्रा” या संकल्पनेतून आयोजित मुंबईतील सर्वात मोठ्या शिवजन्मोत्सव सोहळ्याला दि.२० मार्च रोजी सुरुवात झाली आणि शनिवार २३ मार्च रोजी या शिवजन्मोत्सवाची शिवरथ यात्रेने जल्लोषात सांगता झाली.
घाटकोपर अमृतनगर येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हि शिवरथ यात्रा पोहचताच या शिवरथ यात्रेवर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली. दि २१ मार्च रोजी किल्ले शिवनेरी, जुन्नर ते घाटकोपर, मुंबई अशी शिवज्योत दौड शेकडो शिवभक्त तरुणांनी दौडत अवघ्या १५ तासात पार पाडली. या शिवज्योतची भव्य शिवरथ यात्रेसह संपूर्ण घाटकोपर मध्ये आज मिरवणूक काढण्यात आली.
जय महाराष्ट्र गणेश मैदान, पारशीवाडी-जागृती नगर मेट्रो स्थानक- जांभळीपाडा-भटवाडी- बर्वे नगर- जीवदया लेन- सर्वोदय सिग्नल-श्रेयस सिग्नल-साईनाथ नगर-छत्रपती शिवाजी महाराज चौक, अमृतनगर या विभागातुन हि भव्य शिवरथ यात्रा गेली. भगवे फेटे, पारंपरिक वेशभूषेत शेकडो पुरूष व महिला या यात्रेत सहभागी झाल्या होत्या. घोडे, रथ, मुंबईतील प्रसिद्ध असे गुरु माउली ढोल ताशा पथक, पारशीवाडी बिट्स ढोल पथक इत्यादींसह छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांच्या वेशभूषा केलेले तरुण यात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्याच बरोबर घाटकोपर, चांदवली तसेच मुंबईतील सर्वच राजकीय पक्षाचे नेते या रथयात्रेत सहभागी झाले होते. राज्याचे अल्पसंख्यांक आयोग अध्यक्ष हाजी अरफात शेख, भाजपच्या ईशान्य मुंबई महिला मोर्चा प्रमुख रितू तावडे, सामाजिक कार्यकर्ते अनिल गलगली, विलास रूपवते, दिनेश कर्णिक इत्यादींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.  त्याच बरोबर स्नेहा काळे या किन्नर समाजाच्या प्रतिनिधी आणि त्यांचे सहकारी तसेच  जोगती, आराधी समाजही शिवरथ यात्रेत सहभागी झाले होते त्यांना पालखीला खांदा देण्याचा बहुमान देण्यात आला. शिवसेनेचे विभागप्रमुख संजय पोतनीस, राजेंद्र राऊत, नगरसेवक किरण लांडगे, माजी नगरसेवक दीपक हांडे यांच्या हस्ते समितीतर्फे या शिवरथ यात्रेवर हेलिकॉप्टरद्वारे छत्रपती शिवाजी महाराज चौक, अमृतनगर येथे पुष्पवृष्टी करण्यात आली. या वेळी घाटकोपर आणि विक्रोळी मधील उपस्थित शिवभक्तांनी जोरदार जयघोष केला.