हावङा एक्सप्रेसच्या डब्यात आगीची किरकोळ घटना -अग्निशमन दलाच्या सतर्क जवानामुळे अनर्थ टळला

Share this News:

11/11/2019, ठाणे – आज सकाळच्या वेळी मुंबईहून ठाणे स्थानकावर आलेल्या हावङा एक्सप्रेसच्या पहिल्या बोगीमध्ये किरकोळ स्वरुपात आग लागली असून धूर येत असल्याचे रेल्वे कर्मचारी यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने त्या बोगीतून प्रवाशांना खाली उतरवत अग्निशमन दलाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी ठाणे रेल्वे स्थानकावर मुंबईला जाण्यासाठी उभे असलेले पुणे अग्निशमन दलाचे जवान शफिक सय्यद यांनी ही घटना पाहिली.

त्यांनी तातङीने घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तेथे असलेल्या रेल्वे पोलिसांना स्वतः अग्निशमन दलाचे जवान असल्याचे सांगत स्वतःकडे असलेले ओळखपञ दाखवून आग विझवण्याकरिता पुढे जाण्यासाठी परवानगी घेत त्या बोगीत रेल्वे पोलिसांसह प्रवेश केला. तिथे उपलब्ध असलेल्या वाळूच्या साह्याने प्रथम आग विझवली. तसेच नंतर बोगीच्या खाली जाऊन अग्निरोधक उपकरणाचा वापर करत आगीवर पुर्ण नियंत्रण मिळवले व पुढील अनर्थ टाळला. कामगिरी फत्ते होताच सय्यद पुढे मुंबईकडे रवाना झाले.

सदर ठिकाणी केलेल्या उत्तम कामगिरीचा तेथील रेल्वे पोलिस व प्रवाशांनी जवान शफिक सय्यद यांचे मनःपूर्वक आभार मानले.