‘गणेशोत्सवात दानपेटी ऐवजी ज्ञानपेटी ठेवूया’
पुणे, 27/8/2019 : गणेशोत्सवात प्रत्येक गणेशमंडळामध्ये श्रीं च्या मूर्तीपुढे दानपेटी ठेवली जाते. या दानपेटीतील रकमेचा विनोयोग समाजातील गरजूंकरीता केला जातो. परंतु या दानपेटी ऐवजी गणेशोत्सवात प्रत्येक मंडळाने ज्ञानपेटी ठेवावी, असे आवाहन आनंदवन बहुउद्देशीय संस्थेच्या आनंदवन व्यसनमुक्ती व पुर्नवसन केंद्र, मनोविकास प्रकल्प आणि समाजप्रबोधन चॅरिटेबल ट्रस्ट व उडान फाऊंडेशनतर्फे करण्यात आले आहे.
या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक मंडळे व सोसायटयांनी सहभाग घेतला आहे, अशी माहिती केंद्राचे अध्यक्ष डॉ.अजय दुधाणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेला हर्षल पंडित, जयंत हिरे, अनिरुद्ध हळंदे आदी उपस्थित होते.
ग्रामीण भागात आजही पुरेसे शिक्षणाचे साहित्य उपलब्ध होत नाही. त्यामुळे आपल्या माध्यमातून वह्या, पेन, पेन्सील, स्कूल बॅग, बूट किंवा चप्पल असे शालेय साहित्य जमा झाल्यास त्या मुलांपर्यंत हे साहित्य पोहोचविणे शक्य होणार आहे. पुणे शहरातील १००१ गणेशोत्सव मंडळांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे प्रयत्न संस्थेतर्फे केला जात आहे.
लोकमान्य टिळकांनी समाज संघटनासोबतच समाजप्रबोधनाचा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन हा उत्सव सुरु केला. त्यामुळे त्यांच्या विचार अंगिकारुन हा उपक्रम प्रत्येक मंडळाने राबवावा, असा प्रयत्न आम्ही करीत आहोत. पुण्यातील गणेशमंडळांनी ठेवलेल्या ज्ञानपेटी जमा झालेले साहित्य पूरग्रस्त सांगली, कोल्हापूर येथील गावांमधील दोन शाळांतील विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.