सदाशिव पेठेतील १९० महिलांची आरोग्य तपासणी
पुणे, 27/82019 : ग्राहक पेठ, खजिना विहीर तरुण मंडळ यांच्यातर्फे सदाशिव पेठेतील स्काऊट ग्राऊंडजवळ असलेल्या ग्राहक पेठेच्या आवारात महिलांच्या आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये सदाशिव पेठेतील १९० महिलांची संपूर्ण आरोग्य तपासणी विनामूल्य करण्यात आली.
यावेळी ग्राहक पेठेचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक, खजिना विहीर तरुण मंडळाचे अध्यक्ष ओम कासार, अॅमनोरा येस फाऊंडेशनचे विवेक कुलकर्णी, रोटरी क्लब आॅफ पुणे कात्रजच्या विद्या पाटील, पुष्कराज मुळे, गौरी कुलकर्णी, रुपाली बजाज आदी मान्यवर उपस्थित होते. अॅमनोरा येस फाऊंडेशन, रोटरी क्लब आॅफ पुणे कात्रज, आस्था ब्रेस्ट कॅन्सर सपोर्ट ग्रुप, डॉ.संजय वाघमारे यांचे डेंटल डिझाईन्स मल्टीस्पेशालिटी डेंटल क्लिनीक या संस्थांनी देखील उपक्रमाला सहकार्य केले.
सूर्यकांत पाठक म्हणाले, संपूर्ण कुटुंबाला आधार देणा-या महिलांचे स्वत:च्या आरोग्याकडे कायमच दुर्लक्ष होते. त्यामुळे त्यांना झालेले आजार लवकर समजत नाहीत. त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कर्करोग, रक्तदाब, रक्तशर्करा, हिमोग्लोबिन यांसह विविध तपासण्या करण्यात आल्या.
ओम कासार म्हणाले, शिबीरामध्ये करण्यात आलेल्या तपासण्यांनुसार ज्या महिलांमध्ये मोठया प्रमाणात आजार दिसून आले, त्यांना पुढील उपचारांकरीता विनामूल्य मार्गदर्शन देखील करण्यात आले. वेळेत आजारांचे निदान झाल्यास पुढील आरोग्यविषयक अडचणी दूर करणे सोपे होईल, यादृष्टीने हे शिबीर घेण्यात आले.