पुरामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना ७ कोटी १४ लाख ९५ हजार रुपयांचे वाटप
पुणे दि. १५ अगस्त २०१९: पुरामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना प्रत्येकी ५ हजार प्रमाणे ७ कोटी १४ लाख ९५ हजार रुपये वाटप करण्यात आले आहेत. २२ हजार ९६२ कुटुंबांना प्रत्येकी २ हजार २९६ क्विंटल गहू व तांदूळ आणि १० हजार २५१ लिटर केरोसिनचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
पुणे विभागात पूरस्थिती निर्माण झाल्यापासून सातत्याने लक्ष ठेवून आहोत. पूरग्रस्तांना लागणारी मदत व करावयाच्या उपाय-योजनाबाबत संबंधित विभागांना सूचना देण्यात येत आहेत. पुणे विभागाचे आयुक्त म्हणून शासनाने आपणास जे अधिकार दिले आहेत, त्याची ताततडीने अंमलबजावणी करण्यात येत असून आवश्यकते प्रमाणे अधिकारी व कर्मचारी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात पाठविण्यात आले असल्याचे सांगून डॉ. म्हैसेकर म्हणाले, दोन्ही जिल्ह्यातील पूरस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी युध्द पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. तातडीने मदत म्हणून प्रत्येक कुटुंबास ५ हजार रुपये रोख रक्कम देण्यात येत असून उर्वरित रक्कम त्यांच्या बँकेच्या खात्यात जमा करण्यात येत आहे. आता पर्यंत विभागातील १४ हजार २९९ कुटुंबांना या रकमेचे वाटप करण्यात आले असून उर्वरित पूरग्रस्तांना मदतीच्या वाटपाचे काम सुरूच आहे.
सांगली जिल्ह्यात ३ लाख ११ हजार २२० तर कोल्हापूर जिल्ह्यात ४ लाख ३ हजार ४३५ व्यक्तींचे सुरक्षितस्थळी हलवून त्यांच्या तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करण्यात आली आहे.
सांगली जिल्ह्यातील ४७ बंद रस्त्यांपैकी ३२ रस्ते वाहतुकीसाठी सुरू झाले आहेत. तर कोल्हापूर जिल्ह्यातील ८८ पैकी ६२ रस्ते खुले झाले आहेत. एसटी वाहतुकीच्या बाबतीत सांगली जिल्ह्यातील बंद ४५ मार्गांपैकी ३७ मार्ग सुरू झाले असून कोल्हापूर जिल्ह्यात ३१ पैकी २३ मार्ग सुरू करण्यात आले आहेत.
बँकीग सेवेच्या बाबतीत सांगली जिल्ह्यात ३२९ एटीएमपैकी २२६ एटीएम सुरु झाले असून कोल्हापूर जिल्ह्यात ६४७ पैकी ३२० एटीएम सुरु झाले आहेत. पुरामुळे विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. हे काम लगेच युध्द पातळीवर सुरू करण्यात आले असून त्याचा परिणाम म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील २४ उपकेंद्र, ३ हजार ९७ रोहित्र व १ लाख ५८ हजार ६५१ बिगर कृषी ग्राहकांचा विद्युत पुरवठा महावितरणने पुर्ववत केला आहे. तर सांगली जिल्ह्यात ११ उपकेंद्र, २ हजार ४९६ रोहित्र व १ लाख २२ हजार ८५३ ग्राहकांचा विद्युत पुरवठा सुरू करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री सहायता निधी
मुख्यमंत्री सहायता निधी करिता पुणे विभागातील आयुक्त कार्यालयात आतापर्यंत ६ लाख २५ हजार इतक्या रकमेचे धनादेश विविध संस्था व व्यक्तींकडून प्राप्त झाले आहेत. या व्यतिरिक्त कपडे, बिस्कीट, पाण्याच्या बाटल्या, दूधपावडर आदी जीवनावश्यक साहित्य व वस्तू स्वरूपात प्राप्त होत असून आजपर्यंत सांगलीसाठी ४३ तर कोल्हापूरसाठी ४० ट्रक असे एकूण ८३ ट्रकव्दारे मदतीचे साहित्य पाठविण्यात आले आहेत.
सध्या औषध व उपचाराची आवश्यकता पाहून मोठ्या संख्येने वैद्यकीय पथके पाठविण्यात आली आहेत. सांगली जिल्ह्यात १७४, कोल्हापूर जिल्ह्यात १६९ तर सातारा जिल्ह्यात ७२ अशी एकूण ४१५ वैद्यकीय पथके कार्यरत आहेत.
घराच्या पडझडीच्याबाबतीत सर्व्हेक्षणाचे काम सुरू असून प्राप्त माहितीनुसार सांगली जिल्ह्यात पूर्णत: पडझड झालेल्या घरांची संख्या ११ असून १ हजार ८२९ घरांची अंशत: पडझड झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ५८८ पूर्णत: तर ९ हजार ४१३ अंशत: घरांची पडझड झाली आहे. शिवाय ३२७ गोठ्यांची पडझड झाली आहे.
पुणे जिल्ह्यात १७ लाख ५० हजार रुपये ३५० ग्रामीण भागातील कुटुंबांना, सातारा जिल्ह्यातील ५६६ ग्रामीण कुटुंबांना, २८ लाख ३० हजार तर सोलापूर जिल्ह्यातील ३९८ ग्रामीण भागातील कुटुंबांना १९ लाख ९० हजार रुपयांचे ५ हजार रुपये प्रमाणे वाटप करण्यात आली आहे.
सांगली जिल्ह्यात ग्रामीण भागात ६ हजार ३३५ तर शहरी भागातील २ हजार २३३ कुटुंबांना ४ कोटी २८ लाख ४० हजार रूपयांचे ५ हजार प्रमाणे वाटप झाले आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भाग ४ हजार १३० तर शहरी भागातील २८७ कुटुंबांना 2 कोटी20 लाख 85 हजार रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. मदतीच्या वाटपाचे काम अजूनही सुरू असल्याची माहिती डॉ. म्हैसेकर यांनी दिली.
पुणे विभागातील पूर परिस्थिती व उपाययोजना बाबत माहिती (दिनांक 15.8.2019 वेळ 12.00 वाजता)
पर्जन्यमान :-
सांगली जिल्हयामध्ये आज अखेर एकूण 541.44 मि.मी. इतका पाऊस झालेला असून आज अखेरच्या सरासरी पर्जन्यमानाची तुलना करता 215.77% इतका पाऊस पडला आहे.
कोल्हापूर जिल्हयामध्ये आज अखेर झालेला पाऊस 1672.84 मि.मी. झालेला असून आजअखेरच्या सरासरी पर्जन्यमानाची तुलना करता 126.12% इतका पाऊस पडला आहे
पाण्याची पातळी :-
आयर्विन पुल :- येथील धोका पातळी 45’00” आहे. ती आज दुपारी 12 वाजेपर्यंत 32’11” इतकी आहे.
राजाराम बंधारा :- येथील धोका पातळी 43’00” आहे. ती आज दुपारी 12 वाजेपर्यंत 38’01” आहे.
स्थानांतरित व्यक्ती
सांगली जिल्हयामध्ये 4 तालुक्यातील 104 गावे बाधित झाली असून यामधील 69 हजार 67 कुटुंबातील 3 लाख 11 हजार 220 व्यक्ती सदया स्थानांतरित आहेत. या स्थानांतरित व्यक्तीसाठी आज एकूण 92 तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आलीआहे.
कोल्हापूर जिल्हयामध्ये 12 तालुक्यातील 322 गावे पुरामुळे बाधित झालेली असून स्थानांतरित व्यक्तींची संख्या 4 लाख 3 हजार 435 इतकी आहे व त्यांच्या साठी 202 तात्पुरते निवारा केंद्र सुरु आहेत.
पुरामुळे वेढलेली गावे :-
सांगली जिल्हयामध्ये आज रोजी संपर्क तुटलेले एकही गाव शिल्लक नाही.
कोल्हापूर मध्ये शिरोळ या एकाच तालुक्यातील एकूण 9 गावांचा संपर्क तुटल्याने यामधील 26 हजार 597 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.
घरांची पडझड 🙁दिनांक 14/8/2019 पर्यंत)
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या घरांचे सर्वेक्षणाचे काम सुरु आहे. आतापर्यंत प्राप्त माहितीनुसार सांगली जिल्हयामध्ये पूर्णत: पडझड झालेल्या घरांची संख्या 11 असून या व्यतिरिक्त 1 हजार 829 घरांची अंशत : पडझड झालेली आहे.
कोल्हापूर मध्ये पूर्णत: पडझड झालेल्या घरांची संख्या 588 असून या व्यतिरिक्त 9 हजार 413 घरांची अंशत: पडझड झालेली आहे. तसेच 327 गोठयाची पण पडझड झाली आहे.
मदत व बचाव कार्य :-
सांगली जिल्हयामध्ये एकूण 8 बचाव पथके कार्यरत आहेत. तसेच बचाव कार्यासाठी 20 बोटी व 176 जवान कार्यरत आहेत.
कोल्हापूर जिल्हयामध्ये एकूण 7 बचाव पथके, 25 बोटी व 180 जवान कार्यरत आहेत.
वैद्यकीय पथके :-
सांगली जिल्हयामध्ये 174, कोल्हापूर मध्ये 169, व सातारा जिल्हयामध्ये 72 अशी एकूण 415 वैद्यकीय पथके सध्या कार्यरत आहेत.
सहाय्यता निधी व मदत वाटप :-
मुख्यमंत्री सहायता निधी करीता पुणे विभागीय आयुक्त कार्यालय मध्ये आतापर्यंत व्यक्ती/संस्था यांनी एकूण 6 लाख 25 हजार इतक्या रकमेचे धनादेश सूपुर्त केले आहेत.
या व्यतिरिक्त कपडे, बिस्कीट पाकीटे, पाण्याच्या बॉटल, दुध पावडर पाकीटे, मेणबत्त्या, सोलार लाईट व तातडीच्या उपचारासाठी आवश्यक औषधे इत्यादी विविध स्वरुपामध्ये मदत विभागीय आयुक्त कार्यालयास प्राप्त होत आहे.
आजपर्यंत सांगलीसाठी 43 ट्रक व कोल्हापूरसाठी 40 ट्रक असे एकूण 83 ट्रकद्वारे साहित्य पोहचविण्यात आलेले आहे.
महावितरण :- (दिनांक 14/8/2019 पर्यंत)
सांगली जिल्हयातील 11 – उपकेद्र, 2 हजार 493 – टान्सफॉर्मर व 1 लाख 22 हजार 863 बिगर कृषी ग्राहकांचा विद्युत पुरवठा सुरु केला आहे.
तसेच कोल्हापूर जिल्हयातील 24 – उपकेंद्र, 3 हजार 97- टान्सफॉर्मर व 1 लाख 58 हजार 651 बिगर कृषी ग्राहकांचा विद्युत पुरवठा सुरु केला आहे.
कोल्हापूर व सांगली जिल्हयातील विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यासाठी पुणे, बारामती व सातारा येथून 48 पथके कोल्हापूर येथे व 12 पथके सांगली येथे कार्यरत आहेत.
वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी लागणारे साहित्य पुरेशा प्रमाणात उपलब्ध केलेले आहे.
बँकीग सेवा :-
सांगली जिल्हयातील एकूण 329 एटीएम पैकी 226 एटीएम सुरु करणेत आले आहेत.
कोल्हापूर जिल्हयातील एकूण 647 एटीएम पैकी 390 एटीएम सुरु करणेत आले आहेत.
बंद पुल व बंद रस्त्यांची माहिती :-
सांगली जिल्हयामध्ये एकुण 47 बंद रस्त्यांपैकी 32 रस्ते वाहतूकीसाठी सुरु करण्यात आले आहेत.
कोल्हापूर जिल्हयामध्ये एकुण 88 बंद रस्त्यांपैकी 62 रस्ते वाहतूकीसाठी सुरु करण्यात आले आहेत.
एस. टी. वाहतूक :-
सांगली जिल्हयामध्ये पुरपरिस्थतीमध्ये एकूण 45 मार्ग बंद होते. त्यापैकी 37 मार्ग सुरु करण्यात आलेले आहेत.
कोल्हापूर जिल्हयामध्ये ही एकूण 31 मार्गांपैकी 23 मार्ग सुरु करण्यात आले आहेत.
सानुग्रह अनुदान वाटपाबाबत अहवाल :-
(शासन निर्णय दिनांक 08 ऑगस्ट,2019 नुसार ग्रामीण भागासाठी रु. 10 हजार तर शहरी भागासाठी 15हजारांचे वाटप)
अ.क्र. | जिल्हा | दिनांक 14/08/2019 अखेर वाटप केलेली रक्कम | ||
कुटूंब संख्या | रोखीने दिलेली रक्कम | |||
ग्रामीण | शहरी | |||
1 | पुणे | 350 | 0 | 17,50,000 |
2 | सातारा | 566 | 0 | 28,30,000 |
3 | सांगली | 6335 | 2233 | 4,28,40,000 |
4 | सोलापूर | 398 | 0 | 19,90,000 |
5 | कोल्हापूर | 4130 | 287 | 2,20,85,000 |
एकूण | 11779 | 2520 | 7,14,95,000 |
दिनांक 14/08/2019 पर्यंत पुणे विभागातील एकूण 22 हजार 962 कुटूंबांना 2 हजार 296 क्विंटल गहू, 2 हजार 296 क्विंटल तांदूळ व 10 हजार 251 लिटर केरोसिन वाटप करण्यात आलेले आहे.
तसेच एकूण 14 हजार 299 कुटूंबांना प्रत्येकी ५ हजाराप्रामणे एकूण रु. 7 कोटी 14 लाख 95 हजार (रु. सात कोटी चौदा लाख पंच्यान्नव हजार) एवढी रोख रक्कम वाटप करण्यात आलेली आहे.
टिप:- वर नमूद माहिती दिनांक 14/8/2019 रोजीपर्यंतची आहे.