विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरला क्रांतिवीर चापेकर विद्या मंदिर शाळेतील सदिच्छा समारंभ
पिंपरी, ता. 13 – प्राथमिक शिक्षणाचा टप्पा यशस्वीपणे पार करत माध्यमिक शिक्षणाकडे वाटचाल करणार्या विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरला क्रांतिवीर चापेकर विद्या मंदिर शाळेतील सदिच्छा समारंभ. या दिवशी शालेय जीवनातील रम्य आठवणी ,बालपणीच्या मित्र मैत्रिणी, शिक्षक, शाळा, शाळेतील शिस्त या सर्वच गोष्टींच्या आठवणींना उजाळा मिळाला. शुक्रवारी (दि. १२) या सदिच्छा समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
प्राथमिक शिक्षण हा जीवनाचा पाया असल्याने त्याचे महत्व अधिक आहे. प्राथमिक शाळेतील हे सोनेरी क्षण अविस्मरणीय व्हावेत म्हणून क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचलित क्रांतिवीर चापेकर विद्या मंदिर चिंचवड शाळेतील इ.५ वी व ६ वी च्या विद्यार्थ्यांनी इ.७ वी च्या विद्यार्थ्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी सदिच्छा समारंभाचे आयोजन केले होते.
यावेळी हस्ताक्षर वर्गाचे संचालक विजयकुमार मेंडजोगी हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाला शाला समितीचे अध्यक्ष गतिरामजी भोईर,अशोक पारखी, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक जगन्नाथ देवीकर,खिंवसरा पाटील विद्या मंदिरचे मुख्याध्यापक नटराज जगताप उपस्थित होते.
यावेळी शाळेने राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती संगणकाद्वारे देण्यात आली. विजय मेंडजोगी यांनी खरा चेहरा ओळखण्यास शिका व व्यावहारिक जगात कोणत्याही मोहाला बळी पडू नका.स्वतःवर विश्वास ठेवा असा संदेश दिला. अनेक शास्रज्ञांचे गुण गोष्टींमधून प्रभावीपणे सांगितले. शब्द कसे तयार होतात त्याविषयी प्रात्यक्षिक दाखवून त्यांनी मार्गदर्शन केले.
शाळा समितीचे अध्यक्ष अशोक पारखी व गतिराम भोईर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत माध्यमिक शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी इ.७ वी च्या विद्यार्थ्यांनी मनोगत, कविता याद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या. विद्यार्थी व शिक्षकांना भावना अनावर झाल्याने त्यांनी डोळ्यातील अश्रूंना मोकळी वाट करुन दिली. शिक्षक व विद्यार्थ्यांनी भावपूर्ण शुभेच्छा गीत सादर केले. यावेळी इ.७वी मधील आकांक्षा सुपेकर व भीमाशंकर जिरगे यांना आदर्श विद्यार्थी म्हणून गौरविण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका वासंती तिकोने यांनी आदर्श विद्यार्थ्यांसाठी राबवलेली निवड प्रक्रिया समजावून सांगितली. मुलांना शाळेकडून पेन व डायरी भेट देण्यात आली तर इ.७ वी च्या विद्यार्थ्यांनी शाळेला आरोग्यवर्धक तांब्याचा पिंप भेट दिला. शिक्षकेतर कर्मचारी मंडलिक दादांनाही मुलांनी भेट दिली. वर्गशिक्षका माधुरी कुलकर्णी यांना विद्यार्थ्यांनी आठवणींचा फोटोअल्बम भेट दिला. माधुरी कुलकर्णी यांनी ‘तुम्ही खूप मोठे व्हा!’ असा आशीर्वाद विद्यार्थ्यांना दिला.
कार्यक्रमाचे आयोजन इ.६ वी व ७ वी च्या विद्यार्थ्यांनी केले. प्रास्ताविक सक्षम मागाडे, अतिथी परिचय यशराज पाटील, आभार रिदीमा सातकर या विद्यार्थ्यांनी केले. सूत्रसंचालन गिरीजा हिसवणकर या विद्यार्थीनीने केले. पसायदानाने कार्यक्रमाचा समारोप झाला. शाळा समिती अध्यक्ष गतिराम भोईर व माधुरी कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांसाठी अल्पोपहार दिला.