प्रविण तरडे दिसणार इन्स्पेक्टर दिवानेच्या भूमिकेत

Share this News:

16/9/2019: वैविध्यपूर्ण भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनात घर केलेले अभिनेते, लेखक व दिग्दर्शक प्रविण विठ्ठल तरडे यांची ‘मुळशी पॅटर्न’ मधील नन्या भाईची भूमिका खतरनाक गाजली. भाईगिरी नंतर आता संकेत पावसे दिग्दर्शित ‘ट्रिपल सीट’ या चित्रपटात प्रविण विठ्ठल तरडे एका पोलीस इन्स्पेक्टरच्या भूमिकेत आपल्या चाहत्यांच्या भेटीला येत असून ‘ट्रिपल सीट’ मधील त्यांचा इन्स्पेक्टर दिवाने चा लुक असलेले पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे.

 

‘ट्रिपल सीट’च्या नव्या पोस्टरवर खाकी वर्दीतील प्रविण विठ्ठल तरडे यांनी हाताची मुठ बांधून, चेहऱ्यावर काहीसे संयमित भाव ठेवलेले आहेत, ते कुणाला तरी इशारा करत असावेत असे दिसते. प्रेक्षकांनी यापूर्वी तरडे यांना ‘रेगे’ मध्ये पोलीस अधिकारी म्हणून बघितले होते, आता या नव्या लुकमधील त्यांचा भाऊराव दिवाने हा पोलीस अइन्स्पेक्टर नेमका कसा असणार हे बघणे औत्सुक्याचा विषय आहे. अनुष्का मोशन पिक्चर्स आणि एंटरटेनमेंट, अहमदनगर फिल्म कंपनी निर्मित ‘ट्रिपल सीट’ या चित्रपटाचे दिग्दर्शन संकेत पावसे यांनी केले आहे.

 

नरेंद्र शांतीकुमार फिरोदिया निर्मित ‘ट्रिपल सीट’ या चित्रपटात अंकुश चौधरी, शिवानी सुर्वे आणि पल्लवी पाटील यांच्या प्रमुख भूमिका असून या पोस्टरच्या माध्यमातून प्रविण विठ्ठल तरडे यांचीही महत्वपूर्ण भूमिका असल्याचे दिसते, या चित्रपटात आणखी कोणते कलाकार आहेत? हे जाणून घेण्यासाठी थोडे दिवस वाट बघावी लागणार आहे,

 

 

‘ट्रिपल सीट’ या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि क्रिएटीव्ह दिग्दर्शन अॅड. अभिजित अरविंद दळवी याचे असून सहनिर्माता स्वप्नील संजय मुनोत आणि सहाय्यक निर्माता अॅड. पुष्कर श्रीपाद तांबोळी आहेत. चित्रपटाला अविनाश – विश्वजित यांचे संगीत आणि पार्श्वसंगीत लाभले आहे, तर गुरु ठाकूर, मंदार चोळकर, अश्विनी शेंडे, विश्वजित जोशी यांची गीते आहेत. ‘वायरलेस प्रेमाची गोष्ट’ अशी टॅगलाईन असलेला ‘ट्रिपल सीट’ हा मराठी चित्रपट यंदाच्या दिवाळीत दिवाळीत २४ ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.