कलम ३७० हटवल्याने दह्शतवाद बंद होईल – एम. एस. बिट्टा
पुणे, दि. 4 – जम्मू-काश्मीर हा भारताचा एक अविभाज्य भाग असून काश्मीर शिवाय भारत हा अपूर्ण आहे; म्हणून ३७० कलम हटवल्याने भारत भविष्यात दहशतवादी कारवायांपासून मुक्त झालेला देश असेल, यापुढील ध्येय पाकव्याक्त काश्मीर मिळविणे असायला हवे असे प्रतिपादन एआयएटीएफचे चेअरमन, ‘जिवंत शहीद’ एम.एस. बिट्टा यांनी केले.
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट, पुणे यांच्यावतीने अखंड हिंदुस्थानातील गणेशोत्सवाच्या छायाचित्रांच्या ‘चित्रग्रंथ’ या स्मरणिकेचे अनावरण बिट्टा यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस होते. तर पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
या वेळी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र गुप्ता, युवा उद्योजक व उत्सवप्रमुख पुनीत बालन, माणिकचंद ऑक्सीरिचच्य अध्यक्षा जान्हवी आर. धारिवाल, कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, तांबडी जोगेश्वरी मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ टिकार, गुरुजी तालीम मंडळाचे अध्यक्ष प्रवीण परदेशी, तुळशीबाग गणपती मंडळाचे विवेक खटावकर, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी व अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णासाहेब थोरात, राजाराम मंडळाचे युवराज निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना एम.एस. बिट्टा म्हणाले,”आपल्या देशातील राजकीय पक्षांचे कितीही वैचारिक मतभेद असले तरी ध्येय मात्र एकच असायला हवे. 370 कलम हटवणे ही कृती काश्मिरी जनता , मुस्लिम विरोधी नाही. तो देश हितासाठीचा महत्वाचा निर्णय आहे”
डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, “भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी लोकांच्या मनात सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रेरणा निर्माण करण्यासाठी भाऊसाहेब रंगारी यांनी आपल्या हातानी दुष्ट व अन्याय्य प्रवृत्तींच्या विरुद्ध लढण्याची प्रेरणा देणाऱ्या गणेशाच्या मूर्तीची स्थापना केली. शिवाय भाऊसाहेब रंगारीं यांचा टिळकांच्या नेतृत्वाला पाठींबा होता. तर, केसरी मध्ये भाऊसाहेबांच्या कार्याचा गौरव केसरी मध्ये टिळकांनी केल्याचे आढळते. गणेशोस्तवाचे वैशिष्ट्य सांगताना पुढे ते म्हणाले, हा एक असा उत्सव आहे ज्याला कुठला धर्म नाही, कुठली जात नाही.” शिवाय एम.एस. बिट्टा यांचे कर्तृत्व आजच्या आणि येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी मार्गदर्शक आहे असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या, राष्ट्रीयत्व आणि एकसंध समाज घडवणे हे सार्वजनिक गणेशोत्सवाचे उद्दिष्ट आहे. हाच गाभा लोकमान्यांनी आपल्या विचारांतून मांडला. आजही पुण्यातील गणेशोत्सव मंडळे, विधायक वृत्तीने या परंपरेचे पालन करताना दिसत आहेत. त्यामुळे बिनबुडाचे वाद-विवाद निर्माण न करता हा उत्सव लोकांसमोर यावा. कार्याक्रमाचे प्रास्ताविक उत्सवप्रमुख पुनीत बालन यांनी केले. तसेचसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले.