31जुलैला रिक्शा चालकांची असंतोष प्रकट निदर्शने,सामाजिक अंतरासाठी केरळचा छत्री पॅटर्न वापरणार

Share this News:
पुणे दि.29 – कोविड १९ व त्याला आटोक्यात आणण्यासाठी संचारबंदी, जमावबंदी तसेच वाहतुकबंदी मुळे गेले 4 महीने रिक्शा बंद आहेत.परिणामी रोज प्रवासी सेवा दिली तरच घरची चूल पेटणाऱ्या रिक्षाचालकाला रोजगार नाही. ऑटो रिक्षाची आभासी (vartual)मालकी रिक्शा चालक मालकाकडे असते. मात्र विविध बंधने व नियम हे शासन, प्रादेशिक / जिल्हा परिवहन प्राधिकरण ठरवत असतात. अगदी रिक्षाचा रंग, हद्द, आसन संख्या, मीटर दर, मीटर प्रकार,चालकाचा गणवेश याचे निर्णय शासन घेते. म्हणून रिक्शा हे लोकसेवा वाहन आहे. त्याद्वारे रिक्षाचालक सार्वजनिक प्रवासी सेवा देतात. शहरात पी एम एल तर राज्यात राज्य परिवहन सेवा ST या सार्वजनिक प्रवासी सेवेच्या चालकांचे पगार चालू आहेत. मात्र रिक्शा चालकाचे हात रिकामेच आहेत. त्यांची परिस्थिति अतिशय हलाखीची झाली असून काही ठिकाणी रिक्शा चालकांच्या आत्महत्येच्या बातम्या येत आहेत. राज्य शासन व स्थानिक प्रशासनाचे याकडे निवेदने,फोन,मेसेजेस या द्वारे लक्ष वेधले असता त्याला कसलाही प्रतिसाद मिळत नाही. म्हणून शुक्रवार 31 जुलै 2020 दुपारी 3वाजता पुणे जिल्हाधिकारी कचेरी समोर रिक्शा चालकांची असंतोष प्रकट निदर्शने होणार आहेत. या आंदोलनात कोविड19 चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आंदोलक शाररिक अंतर राखतील व इतर प्रतिबंधात्मक उपायाचाही अवलंब करतील. त्यासाठी केरळ पॅटर्न प्रमाणे सर्व आंदोलक छत्री वापरणार आहेत. असा निर्णय आज झालेल्या रिक्शा पंचायतीच्या बैठकीत करण्यात आला. अध्यक्षस्थानी पंचायतीचे सरचिटणीस नीतिन पवार होते. बैठकीला रिक्शा चालकांचा मोठा प्रतिसाद होता.
यावेळी बोलताना पवार म्हणाले, “ रिक्षाचे पालक असलेल्या प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाला रिक्षाचालकांचा पूर्ण विसर पडला आहे. सद्यस्थितीत रिक्षा चालकांना दिलासा देणारा एकही निर्णय, शिफारस गेला बाजार साधी चर्चाही प्राधिकरणाने केल्याचा अनुभव नाही. याविषयी मुख्यमंत्र्यांसह विविध पातळ्यांवर निवेदन दिली. त्यांना कसलाही प्रतिसाद शासन,प्रशासनाने अद्याप दिला नाही. या बाबत प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाची बैठक घ्यावी. अशी मागणी रिक्शा पंचायतीने केली होती. त्यावर प्राधिकरणाचे सचिव असलेल्या परिवहन अधिकार्‍यांनी प्राधिकरणाचे अध्यक्ष जिल्हाधिकार्‍यांना 18 मे 2020ला लेखी पत्र लिहून बैठकीसाठी वेळ मागितला. मात्र अडीच महीने झाले तरी जिल्हाधिकार्‍यांना रिक्शा चालकांच्या संकटावर उपाययोजनेच्या बैठकीसाठी वेळ मिळालेला नाही. हे सर्व संतापजनक आहे. म्हणून सरकारचे डोके ठिकाणावर आहे का ? असा जाब विचारणार्‍या लोकमान्य टिळक यांच्या स्मृती शताब्दीच्या व पृथ्वी कष्टकर्‍याच्या हातावर तरलेली आहे असे सांगणार्‍या अण्णा भाउन्च्या जन्म शताब्दीच्या पूर्व संध्येला या सरकारलाही असंतोष प्रकट निदर्शनातून आपण जाब विचारू.”