वाहतूक कोंडीमुक्त भोसरी उड्डाणपुलासाठी ‘अर्बन स्ट्रिट डिझाईन’ – आमदार महेश लांडगे यांच्या “भोसरी व्‍हीजन-२०२०”ची वचनपूर्ती

18/9/2019, पिंपरी, पुणे-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडीमुळे अत्यंत चर्चेत असलेला भोसरी उड्डाणपूल आता मोकळा श्वास घेणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून या पुलाखाली ‘अर्बन स्ट्रिट डिझाईन’ करण्यात येणार आहे. या प्रकल्पाला स्थायी समितीने बुधवारी मान्यता दिली.

भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी हाती घेतलेल्या ‘भोसरी व्‍हीजन-२०२०’ मध्ये भोसरी उड्डाणपुलाखाली होणारी कोंडी आणि वाहतूक सक्षमीकरणचा संकल्प करण्यात आला होता. उड्डाणपुल उभारताना नियोजनाचा अभाव असल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत आहे. त्यामुळे २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीला सामोरे जात असताना आमदार लांडगे यांनी उड्डाणपुलाखालील वाहतूक कोंडी सोडवण्याचे आश्वासन दिले होते.

महापालिका निवडणुकीत भाजपाची सत्ता मिळाल्यानंतर या कामाला गती मिळाली. गेल्या दोन वर्षांच्या कार्यकाळात ‘अर्बन स्ट्रिट डिझाईन’ प्रकल्पाचा अभ्यास करण्यात आला. त्याआधारे सल्लागार नियुक्ती, प्रशासकीय तयारी आणि निविदा प्रक्रिया राबवण्याची कार्यवाही करण्यात आली. आता पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीने या प्रकल्पाच्या कामाला मंजुरी दिली आहे.
नियोजनआभावी भोसरी उड्डाणपुलाखाली वाहतुकीचा बोजवारा उडाला होता. ट्रॅव्‍हल्स आणि बसचे नियमबाह्य पार्किंग, अतिक्रमण, पथारीधारकांचे स्टॉल्स, मजूर अड्डा यामुळे वाहतूक विस्कळीत होत आहे. त्यामुळे भोसरीचा उड्डाणपूल म्हणजे वाहनचालकांसाठी डोकेदुखी असे समीकरण झाले आहे. रस्त्यावर पादचा-यांचा वापर अधिक असल्याने अशा ठिकाणी विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिलांना अपघाताला सामोरे जावे लागते. याबाबींचा विचार करता हे रस्ते पादचा-यांची सुरक्षितता विचारात घेऊन ‘अर्बन स्ट्रीट डिझाईन’नुसार विकसित केल्याने अपघातांची संख्या कमी होणार आहे. तसेच पादचा-यांच्या सुरक्षिततेमध्ये वाढ होणार आहे.

महापालिका प्रशासनाच्या वतीने उद्या (दि.१९) या प्रकल्पाचे भूमीपुजन करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे काम आगामी एक वर्षात पूर्ण होईल, अशी माहिती महापालिका स्थापत्य विभागाने दिली.

नागरिकांचा काय होईल फायदा?

– पदपथ समपातळीत व विनाअडथळा असल्याने शहरातील सर्व घटकांसाठी सुरक्षित.
– विशेषत लहान मुले, दिव्यांग व वयोवृद्धांसाठी सुरक्षित.
– नागरिकांसाठी सार्वजनिक बैठक व्यवस्था असल्याने आनंदमयी वातावरण.
– वाहन व्यवस्था, स्थानिक व शहराशी जोडणारी सुलभा सार्वजनिक वाहतूक व्यवस्था
– सुलभ वाहतूक व्यवस्थेमुळे कमीत कमी वायू, ध्वनी प्रदूषण

कसे असेल ‘अर्बन स्ट्रिट डिझाईन’?

– रस्त्याच्या दुतर्फा वॉकिंग ट्रॅक
– स्वतंत्र सायकल ट्रॅक
– पथारी व्यावसायिकांसाठी स्वतंत्र व्यवस्था
– दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था
– गार्डन, ई- टॉयलेट.