वंचित-विशेष मुलांनी दिला लाडक्या बाप्पाला निरोप
पुणे 3/9/2019 : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या चा जयघोष… दहा ढोल ताशा पथकातील वादकांनी केलेले एकत्रित वादन आणि खांद्यावर पालखी घेऊन लाडक्या गणरायाला निरोप देताना मोरया, मोरया… अशा घोषणा देत अनाथ आणि विशेष मुलांनी दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप दिला. ढोल-ताशाच्या गजरात इतिहासाची साक्ष देणा-या विंचुरकर वाड्यापासून निघालेल्या विसर्जन मिरवणुकीत वंचित-विशेष मुलांसह सर्वसामान्य शाळेतील मुले व तरुणाईने देखील मोठ्या संख्येने हजेरी लावली.
मैत्रयुवा फाऊंडेशनच्यावतीने कुमठेकर रस्त्यावर वंचित मुलांसाठी आयोजित विशेष गणेशोत्सवात विसर्जन मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. न. म. जोशी, संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे, मसाप चे कार्याध्यक्ष प्रा. मिलींद जोशी, ढोलताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर, मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी चे विश्वस्त अनिरुध्द गाडगीळ, फाऊंडेशनचे अध्यक्ष संकेत देशपांडे, बालसदन संस्थेच्या अश्विनी नायर, सहेली संस्थेच्या तेजस्वी सेवेकरी, नूतन समर्थ संस्थेचे शेखर पानसरे, अध्यापिका विद्यालयाच्या अश्विनी पानवलकर, दिलासा केंद्राच्या संगीता नागपूरकर उपस्थित होते. कोथरुडमधील बालसदन, सहेली संस्था, नूतन समर्थ ंसंस्था, सेवा सदन दिलासा केंद्रातील मुला-मुलींनी तसेच सामान्य मुलांनी देखील या गणेशोत्सवातील मिरवणुकीत उत्साहाने सहभाग घेतला.
यावेळी मिरवणुकीत उगम, रमणबाग, शौर्य, शिवमुद्रा, ज्ञानप्रबोधिनी, मृत्युंजय, युवा, श्री शिवदुर्गा, गंधार, रुद्रांग, रुद्ररुपम् या ढोल ताशा पथकांनी वादन केले. अशा विविध ढोल-ताशा पथकातील वादकांनी कोणतेही मानधन न घेता विनामूल्य सेवा देत आज एकत्रितपणे वादन करुन विशेष मुलांना वेगळाच आनंद दिला आहे.
प्रा. मिलींद जोशी म्हणाले, या उपक्रमातून संवेदनशिलता दिसून येते. लोकशक्तीला विधायक वळण देण्याचे काम लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवातून केले. अशा उपक्रमांच्या माध्यमातून समाजाची विशेष मुलांकडे पाहण्याची दृष्टी बदलली तर ते उपक्रमांचे खरे यश असेल.
डॉ. रामचंद्र देखणे म्हणाले, आजच्या काळात समाजात वेगवेगळ््या स्तरावर पर्यावरण जनजागृती, अंधश्रध्दा निर्मुलन जागृती अशा विविध विधायक उपक्रमातून गणेशोत्सवात जगजागृती केली जाते. जगामध्ये पुण्यातील गणेशोत्सवाची ओळख धार्मिक, सांस्कृतीक अंगाबरोबर विधायक उत्सव म्हणून देखील होत आहे, असे ही त्यांनी सांगितले.
संकेत देशपांडे म्हणाले, या उपक्रमाचे यंदा १० वे वर्ष होते. अनेकांच्या घरी गणपती बसविला जातो. त्यांना गणेशोत्सवाचे वातावरण अनुभवता येते. परंतु वंचित-विशेष मुलांना देखील गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुकीचा आनंद घेता यावा यासाठी विशेष गणेशोत्सव साजरा केला जातो. त्यांना ढोल-ताशा वादनाचा अनुभव मिळावा यासाठी वीसहून अधिक पथकातील कलाकारांनी ढोल-ताशा वादन केले.