लॉकडाऊनमधील वीजबिल समजून घ्या

electric grid
Share this News:

16/7/2020: लॉकडाऊनमुळे दि. 23 मार्चपासून महावितरणने मीटर रिडींगची मासिक प्रक्रिया तात्पुरती बंद केली होती. त्यामुळे वीजग्राहकांना मार्च किंवा एप्रिल व मे महिन्यात सरासरी युनिटनुसार बिलाची आकारणी करण्यात आली आहे. दि. 1 जूनपासून मीटर रिडींगची प्रक्रिया पुन्हा सुरु झाली आहे. मार्च किंवा एप्रिल ते जूनपर्यंतच्या कालावधीमध्ये घरगुती वीजग्राहकांनी प्रत्यक्षात वापरलेल्या विजेचे मीटर रिडींग घेऊन जून महिन्याचे बिल देण्यात आले आहे. साधारणतः तीन ते चार महिने कालावधीच्या जूनच्या वीजबिलाबाबत संभ्रम दूर करण्यासाठी घरगुती ग्राहकांसाठी https://billcal.mahadiscom.in/consumerbill/ ही लिंक महावितरणच्या www.mahadiscom.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. तसेच लॉकडाऊन संपुष्टात आल्यानंतर प्राप्त झालेल्या वीजबिलाबाबत ग्राहकांचा संभ्रम दूर करण्यासाठी ही प्रश्नोत्तरे.

प्रश्न – लॉकडाऊनंतर मीटर रिडींग घेतल्यानंतर वीजबिल एवढे का आले?

उत्तर – एप्रिल व मे महिन्यात लॉकडाऊनमुळे मीटर रिडींग उपलब्ध होऊ न शकल्याने वीजग्राहकांना मागील तीन महिन्यांच्या वीजवापरानुसार सरासरी वीजबिल पाठविण्यात आले. जून महिन्यात मीटर रिडींगची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यामुळे मागील रिडींगच्या मार्चमधील तारखेपासून ते जूनमध्ये प्रत्यक्षात रिडींग घेण्याच्या तारखेपर्यंत वीजवापराची एकूण युनिट संख्या ही जूनच्या वीजबिलात नोंदविण्यात आलेली आहे. ही युनिट संख्या केवळ जून महिन्याची नाही तर लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये वीजग्राहकांनी प्रत्यक्षात वापरलेल्या एकूण विजेची आहे.

प्रश्न – जून महिन्यातील एकूण युनिट संख्येवर विश्वास कसा ठेवावा?

उत्तर – मीटर हा बिलींगचा आत्मा आहे. ग्राहकांनी प्रत्यक्षात केलेला वीजवापर हा मीटर रिडींगनुसारच स्पष्ट होतो. त्याप्रमाणे मार्च ते जूनपर्यंत वीजग्राहकांनी केलेल्या प्रत्यक्ष वीज वापराची म्हणजेच मीटर रिडींगप्रमाणे एकूण युनिट संख्या ही जूनच्या बिलात नोंदविलेली आहे. तसेच https://billcal.mahadiscom.in/consumerbill/ या लिंकवर वीजग्राहकांनी 2019 व 2020 मध्ये मार्च ते जून या महिन्यांत केलेल्या वीजवापराच्या युनिटची तुलना देखील उपलब्ध आहे. ग्राहकांकडील मीटरचे रिडींग घेतल्यानंतरच एकूण युनिटची संख्या जूनच्या बिलात दर्शविण्यात आली आहेत.

प्रश्न – एकाच महिन्यात तीन महिन्यांचे युनिट दर्शविल्याने स्लॅब व दराचा भुर्दंड पडला का?

उत्तर – नाही. एका पैशाचाही भूर्दंड वीजग्राहकांवर पडलेला नाही. अत्यंत काटेकोरपणे प्रत्येक पैशाचा हिशेब करून वीजग्राहकांवर एका पैशाची अतिरिक्त भुर्दंड पडणार नाही याची दक्षता घेऊन प्रत्यक्ष मीटर रिडींगनुसार हे अचूक वीजबिल वितरीत करण्यात आली आहेत. ग्राहकांनी प्रत्यक्षात वापरलेल्या युनिट संख्येची मासिक विभागणी आणि योग्य स्लॅब व दराप्रमाणे वीजबिलाची आकारणी करण्यात आली आहे. मीटर रिडींगनुसार दिलेल्या वीजबिलांमध्ये कोणताही आर्थिक भूर्दंड ग्राहकांवर बसलेला नाही याबाबत वीजतज्ज्ञांनी सुद्धा स्पष्टपणे निर्वाळा दिला आहे.

प्रश्न – तीन महिन्यांच्या एकूण युनिटला स्लॅबनुसार दर लावला काय?

उत्तर – हो. त्यामुळेच कोणताही आर्थिक भूर्दंड ग्राहकांवर पडलेला नाही. समजा ग्राहकांना तीन महिन्यांचे 426 युनिटचे जूनमध्ये वीजबिल देण्यात आले असेल तर एप्रिल, मे व जूनमध्ये प्रत्येकी 142 युनिटचा वीजवापर झाला आहे, अशी मासिक विभागणी करण्यात आली. म्हणजेच जूनच्या बिलातील 426 युनिटला थेट 301 ते 500 युनिटचा स्लॅब दर न लावता तीन महिन्यांच्या विभागणीनुसार म्हणजे प्रत्येकी 100 युनिटला 0 ते 100 युनिटचा स्लॅब व योग्य दर लावण्यात आला आहे. व त्यानंतरच्या 42 युनिटला पुढील 101 ते 300 च्या स्लॅबनुसार दर लावण्यात आलेला आहे.

प्रश्न – ज्यांनी एप्रिल, मे महिन्यात स्वतःहून रिडींग पाठविले त्यांनाही अशी बिले गेली काय?

उत्तर – नाही. लॉकडाऊन सुरु असला तरी महावितरणच्या आवाहनाप्रमाणे ज्या वीजग्राहकांनी एप्रिल, मे महिन्यात स्वतःहून मीटरचे रिडींग पाठवले आहे त्यांना नेहमीप्रमाणे त्या-त्या महिन्याचे मीटर रिडींगप्रमाणे वीजबिल देण्यात आले आहे.

प्रश्न – सरासरीपेक्षा प्रत्यक्ष वीजवापराच्या युनिटची संख्या अधिक, असे का?

उत्तर – मार्च किंवा एप्रिल ते मे महिन्यात वीजबिल देण्यात आले त्यातील सरासरी युनिट हे हिवाळ्यातील महिन्यांचे होते. लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर उन्हाळ्याची तीव्रता वाढत गेली. सोबतच या कालावधीत सर्वच जण घरी असल्याने टिव्ही, कुलर, फ्रिज इत्यादींच्या माध्यमातून विजेचा वापर वाढला. त्यामुळे मार्च ते जून महिन्यांमधील प्रत्यक्ष वीजवापराची एकूण युनिट संख्या ही मीटर रिडींग घेतल्यानंतर सरासरी वीजबिलांतील युनिटपेक्षा अधिक असल्याचे दिसून येते.

प्रश्न – लॉकडाऊनच्या कालावधीमधील वीजवापराचे जूनमध्ये आलेल्या वीजबिलांची पडताळणीसाठी ही लिंक कुठे उपलब्ध आहे?

उत्तर – वीजबिलांची पडताळणीसाठी महावितरणच्या www.mahadiscom.in या वेबसाईटवर ही लिंक उपलब्ध आहे. तसेच प्रसिद्धी माध्यमे आणि महावितरणकडे नोंदणीकृत मोबाईलधारक ग्राहकांना एसएमएसद्वारे ही लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.

प्रश्न – महावितरणने दिलेल्या लिंकवर वीजदर व स्लॅबची माहिती उपलब्ध आहे का?

उत्तर – हो. https://billcal.mahadiscom.in/consumerbill/ ही लिंक ओपन केल्यानंतर फक्त ग्राहक क्रमांक सबमीट केल्यास घरगुती ग्राहकांना लॉकडाऊन कालावधीतील संबंधीत वीजबिलाची सविस्तर माहिती मिळेल. ज्यामध्ये मा. विद्युत नियामक आयोगाने निश्चित केलेले 31 मार्च 2020 पूर्वीचे व 1 एप्रिल 2020 नंतरचे फिक्स चार्जेस व स्लॅबनुसार वीजदर आदींची माहिती उपलब्ध आहे.

प्रश्न – लॉकडाऊनमधील किती महिन्यांच्या वीजबिलांची माहिती एकाच ठिकाणी आहे?

उत्तर – लॉकडाऊनचा कालावधी ते जूनमध्ये प्रत्यक्ष रिडींग घेतल्याच्या दिवसापर्यंत साधारणपणे तीन ते चार महिन्यांच्या बिलांचा तक्ता या लिंकवर माहितीसाठी उपलब्ध आहे. प्रत्येक महिन्यातील सर्व आकार व शुल्कांची माहिती स्वतंत्रपणे उपलब्ध आहे. यामध्ये पूर्वी घेतलेले मीटर रिडींग व त्याची तारीख, सध्याचे म्हणजे करंट रिडींग व तारीख, एकूण युनिट, रिडींग स्टेटस (रिडिंग घेतले असल्यास नॉर्मल व नसल्यास रिडींग नॉट टेकन असा शेरा), बिल पिरेड (महिन्यात), स्थिर आकार, वीज आकार, वहन आकार, इंधन समायोजन आकार, वीज शुल्क, याआधीच्या सरासरी वीजबिलांची समायोजित रक्कम (वजावट) व एकूण बिलाची रक्कम त्यानंतर पूर्वी बिल भरणा केला असल्यास त्याची तारीख व रक्कम अशी संपूर्ण माहिती या तक्त्यामध्ये देण्यात आली आहे.

प्रश्न – वीजदरासाठी दि. 31 मार्चपूर्वी व दि. 1 एप्रिलपुढे वापरलेल्या युनिटचा विचार केला काय?

उत्तर – हो. या कालावधीपूर्वी किंवा नंतर वापरलेल्या युनिटची संख्या स्पष्टपणे या लिंकवरील माहितीमध्ये नमूद करण्यात आली आहे. तसेच या दोन्ही कालावधीमधील युनिट संख्येला कोणत्या स्लॅबनुसार वीजदराची आकारणी करण्यात आली आहे हे देखील स्वतंत्र तक्त्याद्वारे नमूद करण्यात आले आहे.

प्रश्न – स्थिर, वीज, वहन व इतर आकारासंबंधी कशी माहिती दिलेली आहे?

उत्तर – ABCDEFG या अनुक्रमणिकेनुसार स्थिर आकार, वीज आकार, वहन आकार, इंधन समायोजन आकार, वीजशुल्क आदींची मार्च किंवा एप्रिल ते जूनपर्यंत मासिक आकारणीचा स्वतंत्र तक्ता दिलेला आहे. यामध्ये F– विक्रीवरील कर हा घरगुती ग्राहकांसाठी लागू नाही. मात्र यातील G मध्ये सरासरी वीजबिलांचे समायोजन हा बिलाच्या पडताळणीसाठी महत्वाचा तक्ता आहे. या तक्त्यामध्ये लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये सरासरी देण्यात आलेल्या मासिक वीजबिलांमधील स्थिर आकार व त्यावरील 16 टक्के वीजशुल्काची रक्कम वगळून उर्वरित सर्व आकार दर्शविण्यात आले आहेत व ही संपूर्ण रक्कम जूनच्या वीजबिलातून वजा करण्यात आली आहे.

प्रश्न – पण ज्यांनी सरासरी वीजबिलांची रक्कम भरली आहे ती कशी समायोजित केली आहे?

उत्तर – सरासरी वीजबिलांमधील त्या महिन्यांत लागू असणारा स्थिर आकार व त्यावरील वीजशुल्क वगळून उर्वरित सर्व रक्कम जूनच्या वीजबिलातून वजा करण्यात आली आहे. या प्रकारे मार्च, एप्रिल, मे या महिन्यातील सरासरी वीजबिलांचे जूनमध्ये समायोजन करण्यात आले आहे. आता ज्यांनी या तीनही महिन्यांचे वीजबिल भरले आहे त्यांच्या रकमेचे योग्य समायोजन झाले आहे. मात्र ज्यांनी एक-दोन किंवा तीनही सरासरी वीजबिलांचा भरणा केलेला नाही त्यांना त्या संबंधीत महिन्यांचे वीजबिल थकबाकी म्हणून जूनच्या बिलात दर्शविण्यात आले आहे.

प्रश्न – घरे बंद असताना सरासरी वीजबिल आलेले आहे. ते कसे समायोजित करणार?

उत्तर – लॉकडाऊनमध्ये प्रत्यक्ष रिडींग घेता न आल्याने पूर्वीच्या वीजवापरानुसार ही सरासरी वीजबिले देण्यात आली आहेत. मात्र प्रत्यक्ष रिडींग घेतल्यानंतर सरासरीनुसार देण्यात आलेली अशी वीजबिले संगणकीय प्रणालीद्वारे दुरुस्त करण्यात येतील. त्यासाठी वीजग्राहकांनी कोणतीही तक्रार करण्याची गरज नाही. तसेच या बिलांचा भरणा केला असल्यास त्या महिन्याचा स्थिर आकार व त्यावरील वीजशुल्क वगळून उर्वरित रक्कम पुढील बिलाच्या रकमेतून वजा करण्यात येईल.