‘वनराई’च्या वर्धापन दिनानिमित्त “खेड्याकडे चला” संकल्पनेवर आधारित प्रदर्शनाचे आयोजन 

Share this News:

पुणे, दि. ०६ जूलै २०१९ : ‘वनराई’ येत्या १० जुलै रोजी ३४ व्या वर्षात पदार्पण करत आहे. त्यानिमित्ताने ‘खेड्याकडे चला’ या महात्मा गांधींच्या संकल्पनेवर आधारित भव्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. वनराईच्या प्रमुख उद्दिष्ठांनमध्ये ग्रामीण विकासाचे काम अग्रस्थानी आहे, यामध्ये प्रामुख्याने  पाणलोट व्यवस्थापन, वृक्षलागवड, शाश्वत शेती, सामुहिक शेती, घनकचरा व्यवस्थापन,पशुधन विकास, शिक्षण व आरोग्यविषयक सोयी-सुविधा, महिला सक्षमिकरण व कौशल्य विकास प्रशिक्षण असे विविध उपक्रम राबविण्यात येतात. त्यामुळे यंदाच्या वर्धापन दिनी पुण्यात खेडेगावाची प्रतिकृति वनराईतर्फे साकारण्यात येणार आहे. यामध्ये गावाच्या वेशीच्या आतमध्ये आल्यापासून ते पारावरच्या गप्पांचा अनुभव पुणेकरांना घेता येणार आहे. वनराईचा गेल्या ३३ वर्षातील प्रवास यानिमित्ताने नागरिकांना पाहता येणार आहे. पुण्यातील मित्रमंडळ चौक, पर्वती येथील वनराई संस्थेच्या आवारात हे प्रतिकृतीतील प्रदर्शन असणार आहे.

 

प्रदर्शनामध्ये प्रामुख्याने बांबूची सायकल, अपारंपारिक उर्जा उपकरण, पर्यावरण पुस्तके, हॅंड ट्रॅक्टर, इलेक्ट्रीक सायकल, घरगुती वापराच्या पर्यावरणपूरक वस्तू असणार आहेत. बुधवार, दिनांक १० जुलै रोजी सकाळी १०:०० ते रात्री ८:०० वाजेपर्यंत हे प्रदर्शन असून सर्वांसाठी विनामुल्य प्रवेश आहे. सकाळच्या सत्रात विविध शाळा आणि कॉलेजमधील विद्यार्थी भेट देणार आहेत. तर दुपारी ४ वा. नंतरच्या सत्रात पुणे तसेच राज्यभरातील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी या प्रदर्शनास भेट देणार आहेत.

 

भारतभूमी हरित आवरणाने सदैव नटलेली असावी, इथली पडीक जमीन आणि रिकामे हात सदैव उत्पादनक्षम असावेत, स्वच्छ आणि सुंदर परिसर हा इथला प्रत्येकाचा श्वास असावा, इथले जलस्त्रोत शुध्द पाण्याने नेहमीच खळाळत असावेत, आधुनिक विज्ञान-तंत्राज्ञानयुक्त साधनांचा लाभ  इथल्या समाजस्तरातील शेवटच्या घटकापर्यंत व्हावा हे पद्मविभूषण डॉ. मोहन धारिया तथा अण्णा यांच स्वप्न होते. हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचं संस्थात्मक रुप म्हणजे वनराई, हि वनराई येत्या १० जूलै २०१९ रोजी ३४ व्या वर्षांत पदार्पण करीत आहे.

 

देशातील पडीक जमिनी  उत्पादनक्षम व्हाव्यात आणि देशाच्या हरित क्षेत्रात वाढ व्हावी याकरिता वनराईच्या माध्यमातून शेतकर्‍यांना आजवर २ कोटीहून अधिक बिया व रोपांचे वाटप केले, तसेच जल-मृद संवर्धनासाठी वनराई बंधा-याची चळवळ उभारली. पाणलोट व्यवस्थापनाबरोबरच चराईबंदी, कु-हाडबंदी, नशाबंदी, नसबंदी व श्रमदान हा ‘पंचसुत्री’ कार्यक्रम राबवला. ग्रामीण भागात १३ प्रशिक्षण केंद्र उभारुन शेतक-यापर्यंत आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञान पोहचविले. बचत गटांद्वारे ग्रामीण महिलांना रोजगार उपलब्ध करुन दिला. लोकसहभागातून स्वच्छ, हरित, संपन्न व जलसमृद्ध गावांची निर्मिती केली. यातूनच शाश्वत ग्राम विकासाची गंगा गावागावात वाहू लागली. पश्चिम महाराष्ट्र, कोकण व मराठवाडा अशा विविध भौगोलिक पार्श्वभूमी असलेल्यागावांमध्ये शाश्वत ग्रामीण विकासाद्वारे ‘शहरातून खेड्याकडे’ (Reverse Migration) घडवून आणण्यात वनराईने यश मिळवले. वनराईचे उपक्रम स्थानिक ग्रामस्थांचे गरज लक्षात घेऊन आणि ग्रामस्थांच्या सहभागातून राबविले जातात. या सर्व उपक्रामांचा आढावा ३४ व्या वर्धापन दिनानिमित्त पहावयास मिळणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष रवींद्र धारिया यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी वनराईचे जयवंत देशमुख आणि सुधीर मेकल पत्रकार परिषदेस उपस्थित होते.