पुण्यात आयोजित राष्ट्रीय परिषदेत नावीन्यपूर्ण संशोधनांचा सन्मान - Punekar News

पुण्यात आयोजित राष्ट्रीय परिषदेत नावीन्यपूर्ण संशोधनांचा सन्मान

Support Our Journalism

Contribute Now

पुणे, दि. १८ नोव्हेंबर, २०१९ : आपल्याकडे पाण्याला जीवनाची उपमा दिली जाते. पण अनेक कारणांमुळे पाण्याचे होत असलेले दूषितीकरण ही देखील आज देशासमोरील सर्वांत मोठी समस्या आहे. याकडेच लक्ष वेधत आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणम येथून आलेल्या राजेंद्र प्रसाद मोटूरू यांनी बॅटरीवर चालणारे, वीजविरहित, सहज कोठेही नेता येण्याजोगे व सौरउर्जेवर चालणारे जलशुद्धीकरण यंत्र तयार केले आहे. यामुळे कोणत्याही पाण्याचे सौरउर्जेच्या मदतीने शुद्धीकरण करून ते वापरता येणे शक्य होणार आहे. याच यंत्राच्या निर्मितीसाठी मोटूरू यांचा ‘पुणे इंटरनॅशनल सेंटर’ (पीआयसी) च्या वतीने आयोजित सातव्या नॅशनल कॉन्फरन्स ऑन सोशल इनोव्हेशन’ (एनसीएसआय) मध्ये सन्मान करीत त्यांना गौरविण्यात आले.

देशभरातील शहरी, ग्रामीण आणि आदिवासी भागातील नावीन्यपूर्ण संशोधनांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘पुणे इंटरनॅशनल सेंटर’ (पीआयसी)च्या वतीने सातव्या नॅशनल कॉन्फरन्स ऑन सोशल इनोव्हेशन’ (एनसीएसआय)चे आयोजन बाणेर रस्त्यावरील यशदा येथे करण्यात आले होते. या परिषदेत शहरी, ग्रामीण आणि आदिवासी भागातील नावीन्यपूर्ण संशोधनातील प्रत्येकी एक अशा तीन संशोधकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. विजय केळकर, एमसीसीआयएचे अध्यक्ष प्रदीप भार्गवा आणि पीआयसीचे मानद संचालक प्रशांत गिरबने आदी यावेळी उपस्थित होते.

आज पुरस्काराने सन्मानित झालेल्यांमध्ये आदिवासी विभागातील राजेंद्र प्रसाद मोटूरू यांच्या सौर जलशुद्धीकरण यंत्राचा समावेश आहे. वाहणा-या कोणत्याही अशुद्ध पाण्यावर सौरउर्जेच्या मदतीने प्रक्रिया करणारे हे प्युरीफायर सकाळी ६ ते सायं ६ या वेळेत तब्बल ६०० ते ७०० लिटर पाणी शुध्द करते. इतकेच नाही तर कोणत्याही भूभागावर हे यंत्र घेऊन जाता येते यामुळे ग्रामीण भाग, शाळा, रुग्णालये, पंचायती ऑफिसेस आणि सार्वजनिक ठिकाणी त्याचा प्रभावी वापर होऊ शकतो. याबरोबरच ग्रामीण विभागात हिमोग्लोबीन, ऑक्सिजन सॅच्युरेशन लेव्हल यांची शरीरामधून रक्त न काढता तपासणी करणारे यंत्र पश्चिम बंगालच्या पार्थप्रतीम दसमहापात्रा यांनी तयार केले असून याद्वारे वर नमूद चाचण्या लवकरात लवकर करणे शक्य होऊ शकते. याशिवाय शहरी विभागात कर्नाटकाच्या मयूर शेट्टी यांचे रक्त, पेशी यांबरोबर बायोलॉजिकल अवयवांची वाहतूक करताना वातावरण स्थिर ठेवणा-या ‘संजीवनी’ या उपक्रमाचा देखील समावेश या पुरस्कार्थी संशोधनामध्ये आहे. या उपकरणाने वाहतुक करीत असताना २ ते ८ डिग्री चे तापमान स्थिर ठेवले जाते. या तीन संशोधनाबरोबरच शेती, वाहतूक, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण या विषयांशी संबंधित संशोधनांचा या परिषदेत सहभाग होता.

‘पुणे इंटरनॅशनल सेंटर’ (पीआयसी), ‘टाटा इन्स्टट्यूट ऑफ सोशल सायन्सेस’ आणि नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशन इंडिया’ यांच्या संयुक्त विद्यमाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ज्यासाठी देशभरातील १०० हून अधिक संशोधकांनी नोंदणी केली होती. या परिषदेसाठी निवड झालेल्या १८ संशोधकांना या वेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ व पीआयसीचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ माशेलकर आणि ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. विजय केळकर यांच्या हस्ते प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. याशिवाय सर्व संशोधकांणी आपले संशोधनाचे सादरीकरण या वेळी उपस्थितांसमोर केली. उपस्थितांसमोर मुख्यत: देशभरातील मोठ मोठ्या कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. जेणेकरून या नावीन्यपूर्ण संशोधनांणा भविष्यात मदत मिळून ते संस्थांच्या सीएसआर मार्फत जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचू शकेल. संशोधकांना व्यासपीठ मिळवून देण्याबरोबरच त्यांचे संशोधन अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचावे हाच या राष्ट्रीय परिषदेमागील मुख्य हेतू आहे.

Punekar News is now on Telegram. For the latest Pune, Pimpri Chinchwad PCMC news, Like our Facebook Page, follow on Twitter and Instagram and also subscribe to Punekar News on Telegram.
error: Content is protected !!