राज्यातील सायबर गुन्हे नियंत्रणात आणण्यात सरकार अपयशी.

Share this News:

–आमदार प्रकाश गजभिये यांचा आरोप

मुंबई – दि.6 : राज्यात 2014 सालच्या तुलनेत 2015 या वर्षात सायबर गुन्हयात लक्षणीय वाढ झाली असून राज्यातील सायबर गुन्हे नियंत्रणात आणण्यात सरकार सपशेल अपयशी ठरल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार प्रकाश गजभिये यांनी विधान परिषदेत केला.

आज सायबर गुन्ह्यांबाबत विचारलेल्या तारांकित प्रश्नावेळी  बोलताना ते म्हणाले राज्यात मुंबई, ठाणे, औरंगाबाद,पूणे व नागपुर हे पाच जिल्हे सायबर क्राइम मध्ये टॉप फाईव्ह म्हणून समोर आले आहेत , राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारी नुसार सायबर गुन्हे वाढले असून सन 2014 मधे 511 गुन्ह्यावरुन  हे प्रमाण सन 2015 मध्ये 1036 गुन्हयावर गेले असल्याचे जानेवारी 2016 मधे निदर्शनास आले असून  सायबर गुन्हयांना आळा घालण्यासाठी शासनाने प्रशिक्षीत व्यक्तींची नियुक्ती केली आहे हे खरे आहे काय ? असा तारांकित प्रश्न गजभिये यांनी विधानपरिषदेत केला.

यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सायबर गुन्हयात लक्षणीय वाढ झाल्याचे मान्य करीत शासनाने विशेष पोलिस महानिरीक्षक, सायबर व महिला अत्याचार प्रतिबंध यांचे नियंत्रणाखाली स्वतंत्र कक्षाची स्थापना केलेली आहे व प्रत्येक जिल्ह्यात सायबर लॅब ची स्थापना करण्याची प्रक्रिया सुरु असून , न्यायवैद्यकीय प्रयोगशाळा, कलिना, मुंबई येथे पोलिसांना प्रशिक्षण देण्यात येत आहेत असे उत्तर यावेळी दिले.