गणेशोत्सव काळात रुग्णवाहिकांची सुविधा ही काळाची गरज : पांडुरंग बलकवडे
पुणे, 26/8/2019 : पुण्याचा गणपती आणि पुणे यांचे अतूट नाते आहे. याला शेकडो वर्षांची परंपरा आहे. आज जगाच्या पाठीवर पुण्याच्या गणेशोत्सवाचे स्थान निर्माण झाले आहे. देशाच्याच नव्हे तर जागतिक पातळीवर लोक हा गणेशोत्सव बघण्यासाठी येत असतात. लाखो माणसे एकत्र येतात आणि या गणेशोत्सवाचा आनंद घेतात. अशावेळी काही समस्या निर्माण होतात. त्यावेळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, पोलीस दल आणि सामान्य नागरिक हे एकत्र येऊन हा उत्सव निर्विघ्न कसा पार पडेल, याची नेहमीच काळजी घेत असतात. या रुग्णवाहिका गणेशोत्सव काळात कोणत्याही पद्धतीचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी सदैव दक्ष राहणार आहेत. ही काळाची मोठी गरज आहे, असे मत ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ पांडुरंग बलकवडे यांनी व्यक्त केले.
आम्ही पुणेकर, मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट, हुतात्मा बाबूगेनू मंडळ ट्रस्ट, श्री गजलक्ष्मी ढोल-ताशा पथक या संस्थांतर्फे आरोग्यसेवा आपल्या दारी उपक्रमांतर्गत कलामहर्षी कै. डी. एस. खटावकर सर आणि श्री गजलक्ष्मी परिवारातील ताशा वादक नकुल गोडबोले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ गणेशोत्सवात विविध ठिकाणी कायमस्वरुपी विनामूल्य रुग्णवाहिका सेवा देण्यात येत आहे. या रुग्णवाहिकेचे उद्घाटन ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ पांडुरंग बलकवडे व पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी विवेक खटावकर, डॉ. प्रियांक जावळे, डॉ. वेदव्यास मोरे, डॉ. गणेश तोडकरी, डॉ. संजय जाधव, रवी डोंगरे, अतुल शिंदे, पराग ठाकूर, विकास पवार, नितीन पंडित, विशाल पनसुरिया, सोहम महाजनी, अमित बोरसे, हेमंत जाधव, संतोष फुटक, मंगेश याळगी उपस्थित होते. तसेच आम्ही पुणेकर, मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट, हुतात्मा बाबूगेनू मंडळ ट्रस्ट, श्री गजलक्ष्मी ढोल-ताशा पथक यांच्या संयुक्त विद्यमाने कलामहर्षी कै. डी. एस. खटावकर सर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ जम्मू-काश्मीर येथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व देखील घेण्यात आले आहे.
पांडुरंग बलकवडे म्हणाले, आपल्या गणेशभक्तीला फार मोठी परंपरा आहे. यादवांच्या काळात पुण्यामध्ये गाणपत्य सांप्रदाय होता, याविषयीचे पुरावे उपलब्ध झाले आहेत. याच पुण्यामध्ये मोरया गोसावींनी मध्ययुगामध्ये गणपती सांप्रदाय निर्माण केला जो देशामध्ये सगळीकडे पोहोचला.
स्वप्ना गोरे म्हणाल्या, गणेशोत्सव पोलीस, गणेसोत्सव मंडळे आणि नागरिकांच्या साथीने यशस्वीपणे पार पडतो. अशाप्रकारचे स्तुत्य उपक्रम मंडळे व संस्था राबवित आहेत ही चांगली गोष्ट आहे. यावर्षीचा गणेशोत्सव देखील असाच निर्विघ्नपणे पार पाडुया.
बी.व्ही.जी.च्या १०८ नंबर रुग्णवाहिकेने या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला आहे. पुण्यातील १५ महत्त्वाच्या ठिकाणी या सुसज्ज रुग्णवाहिका ठेवण्यात आल्या आहेत. लालमहाल, शनिवारवाडा, नू.म.वि.शाळा, केसरीवाडा रमणबाग चौक, मंडई टिळक पुतळा, स.प.महाविद्यालय चौक, कसबा पेठ, गणपती चौक, मोदी गणपती चौक, गरुड गणपती चौक, टिळक चौक अशा विविध ठिकाणी रुग्णवाहिका तैनात आहेत. रुग्णवाहिकेत डॉक्टर, नर्स यांसह प्रथमोपचार व आपत्कालीन आरोग्यसुविधा देण्यात आली आहे. मदतीकरीता भाविकांनी १०८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.