चिमुकल्यांनी मुखवटे घालून केक कापत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिल्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा
साईनाथ मंडळ ट्रस्टतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित चित्रपट विविध सामाजिक संस्थांमधील ८० चिमुकल्यांना दाखविण्यात आला; चिमुकल्यांनी मुखवटे घालून केक कापत दिल्या नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा
पुणे : पी. एम. नरेंद्र मोदी चित्रपटातून त्यांचा जीवनपट बघून सामान्य व्यक्ती असामान्य कर्तृत्व घडवू शकते अशी प्रेरणा चिमुकल्यांनी घेतली. लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना घवघवीत यश मिळाले या निमित्ताने विविध संस्थांमधील ८० चिमुकल्यांनी मोदी मोदी… भारत माता की जय… असा जयघोष करीत आनंद व्यक्त केला. मुखवटे घालून केक कापत अनोख्या पद्धतीने चिमुकल्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
बुधवार पेठेतील साईनाथ मंडळ ट्रस्टतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट विविध सामाजिक संस्थांतील ८० चिमुकल्यांना महानगर पालिकेजवळील मंगला थिएटर येथे दाखविण्यात आला. तसेच यावेळी नरेंद्र मोदी यांचे मुखवटे घालून केक कापत, लाडू भरवत त्यांना पुढील कारर्किदीकरीता चिमुकल्यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी नगरसेवक हेमंत रासने, साईनाथ मंडळ ट्रस्टचे पीयुष शहा, कुमार अनवेकर, नरेंद्र व्यास, नंदकुमार ओव्हाळ, विकास महामुनी, मधुकर कदम, कुणाल अनवेकर, सुवर्णा पोटफोडे, सोजवला चांदोरकर उपस्थित होते. गंमत शाळा, एकलव्य न्यास, स्वाधार संस्था या संस्थेतील चिमुकल्यांना हा चित्रपट दाखविण्यात आला.
हेमंत रासने म्हणाले, विविध संस्थांमधील विद्यार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जीवनपट उलगडणारा चित्रपट मंडळातर्फे दाखविण्यात आला, हा एक चांगला उपक्रम मंडळाने राबविला. नरेंद्र मोदींना निवडून देशाचे भविष्य सुरक्षीत झाले आहे. सामान्य व्यक्ती देखील असामान्य कर्तृत्व घडवू शकते. हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवनपटातून समजते. यामधून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी, तुमच्यामधून देखील उद्या नरेंद्र मोदी घडू शकतो असा आत्मविश्वास बाळगा.
पीयुष शहा म्हणाले, विविध सामाजिक संस्थांमधील ८० चिमुकल्यांना आज हा चित्रपट दाखविण्यात आला. तसेच केक कापून, लाडू भरवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच इच्छाशक्ती असेल तर माणूस असाध्य गोष्ट देखील साध्य करू शकतो. असा संदेश विद्याथर््यांनी नरेंद्र मोदी यांच्या जीवपटामधून घेऊन त्यातून प्रेरणा घ्यावी यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित चित्रपट बघितल्यावर एक चहाविक्रेता देशाचा पंतप्रधान होऊ शकतो, तर आपणही आयुष्यात कष्ट केल्यास मोठे यश संपादन करू शकतो असा विश्वास वाटतो. अशी प्रतिक्रीया भूषण परदेशी व जय ठोकळे या चिमुकल्यांनी दिली.