कर्तव्याला भावनेची जोड देणारे सेनापती: निवृत्त विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर आणि माजी जिल्हाधिकारी नवल किशोर राम

मितेश घट्टे
पुणे, ऑगस्ट ६, २०२०: कर्तव्याला भावनेची जोड मिळाल्यास संवेदना जागी ठेवून सेवा पार पडते. माझ्या प्रशासकीय सेवेत कर्तव्याला भावनेची जोड देवून संवेदनशील मनाने सेवा बजावणारे अनेक वरिष्ठ अधिकारी भेटले. त्यामधे आवर्जून ज्यांचा सहवास कायम स्मरणात राहील असे नुकतेच निवृत्त झालेले पुणे विभागीय आयुक्त मा. दीपक म्हैसेकर सर आणि पंतप्रधान कार्यालयाचे उपसचिव म्हणून नियुक्ती झालेले मा. नवल किशोर राम सर.
मा. दीपक म्हैसेकर सर म्हणजे अखंड ऊर्जा देणारा स्त्रोत…
रत्नागिरी जिल्ह्यातून माझी जानेवारी २०१९ मध्ये पुण्याला बदली झाली. त्यानंतर लगेचच लोकसभा निवडणुकांचा बिगूल वाजला. निवडणुकांच्या तयारीसाठी प्रशासनाच्या बैठका सुरू झाल्या. या बैठकांच्या माध्यमातून पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर सरांशी संपर्क आला. त्यातून त्यांच्या कार्याची पद्धत जवळून अनुभवता आली. प्रशासकीय अधिकारी म्हणून एखादी व्यक्ती किती झपाटून काम करू शकते हे त्यांच्याकडे पाहून समजले. आपल्या बरोबर असलेल्या अधिकारी वर्गाला अत्यंत संमजसपणे वागवण्याचा मोठेपणा त्यांच्यात पहायला मिळाला. कर्तव्य बजावताना प्रत्येकाने आपली जबाबदारी प्रामाणिक पार पाडावी असा त्यांच्या स्वभावाचा गुणधर्म. हा गुणधर्मच त्यांची ओळख बनला.
सेवानिवृत्तीला अवघे काही महिने उरले असतानाही कोरोनाच्या काळात म्हैसेकर सरांनी केलेले काम प्रशासकीय अधिकारी वर्गाला प्रेरणा देणारे आहे. त्यामुळेच त्यांनी कोरोना आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न केला. अगदी सेवानिवृत्तीच्या आदले दिवशी मा. मुख्यमंत्री यांच्या आढावा बैठकीत सादर केलेले प्लाझ्मा दान करण्यासाठी व्यासपीठ देणारं ऍप तयार करण्यातला त्यांचा उत्साह वाखण्याजोगा होता. त्यांच्या भावी आरोग्यमय, आनंदी वाटचालीस शुभेच्छा!
मा. नवल किशोर राम सर म्हणजे प्रेरणादायी व्यक्तीमत्त्व…
पुण्यात आल्यानंतर जिल्हाधिकारी नवल किशोर राम सरांशी नेहमी संपर्क आला. पुण्याचे जिल्हाधिकारी म्हणून ते कसे असतील, कडक स्वभावाचे असतील का,असे अनेक प्रश्न मनात यायचे. पण जेव्हा भेट झाली तेव्हा त्यांच्या विषयी एक आदर निर्माण झाला. त्यातूनच त्यांची झालेली मैत्री वृद्गधींगत होत गेली.
पुण्यासारख्या सांस्कृतिक व ऐतिहासिक वारश्याच्या जिल्ह्याचा भला मोठा व्याप सांभाळताना अगदी नियोजनबद्ध काम करण्याचा त्यांचा स्वभाव. सहकारी अधिकारी, कर्मचारी यांच्याशी बोलून चालून कर्तव्य पार पाडण्यावर त्यांचा विशेष भर. अधिकारीपद हे केवळ मिरवायचे नाही तर त्याचा समाजासाठी पुरेपूर उपयोग झाला पाहिजे ही भावना पावलोपावली मनात ठेवून ते कार्यरत राहत. निवडणूक काळात त्यांचे अहोरात्र काम पाहता आले.
पोलीस पाल्यांच्या विद्यार्थी वस्तीगृह इमारतीचे नुतनीकरण असो की, गुन्हे शाखेच्या इमारतीसाठीचा निधी असो, त्यांनी कधीच हात आखडता न घेता तत्परतेने जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत राबवल्या जाणाऱ्या योजनांतील विकास निधी उपलब्ध करून देण्यात मोलाची भुमिका बजावली. आजही त्यांची कार्यपद्धती आमच्यासारख्यांना युवा अधिकाऱ्यांना ऊर्जा देणारीच आहे. त्यांच्या या कार्यपद्धतीचाच सन्मान म्हणून त्यांची पंतप्रधान कार्यालयाचे उपसचिव म्हणून नियुक्ती झाली असावी. या मानाच्या व कमालीच्या जबाबदारीच्या पदावरही ते निश्चितपणे आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवतील यात यत्किंचितही शंका नसावी. तेव्हा आम्हालाही नवप्रेरणेची उभारी मिळेल. श्री नवलकिशोर राम सरांना भावी वाटचालीस मनःपुर्वक शुभेच्छा!
मागील दोन वर्षात पोलीस दलाशी उत्तम संवाद व समन्वय बाळगणाऱ्या तसेच पुणे जिल्हा व विभागात आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या या दोन्ही सेनापतींची आठवण निश्चितच प्रत्येक सहकाऱ्याच्या व पुणेकविभागीय आयुक्तरांच्या ह्दयी कायम असणार आहे.
(श्री मितेश घट्टे हे पुणे शहर विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत.)