गणेशाची कृपा आणि नागरिकांचा विश्वास ही एनडीआरएफची शक्ती – डेप्युटी कमांडंट अलोककुमार 

NDRF Dagdu Seth
पुणे : सांगली, कोल्हापूरमध्ये जीवितहानीसोबतच शहरांचे देखील मोठे नुकसान झाले. एनडीआरएफची टिम तेथे १५ दिवस कार्यरत होती. सुमारे ३५ हजार नागरिकांना आम्ही सुरक्षित जागी हलविले. गणपती हे विघ्नहर्ता आहेत, त्यांची कृपा संपूर्ण महाराष्ट्र व देशावर आणि एनडीआरएफ वर राहू देत. आम्हाला प्रशिक्षण मिळत असले, तरी देखील लोकांचा विश्वास आम्हाला शक्ती देतो. गणेशाची कृपा असेल, तर संकट येणार नाही. मात्र, जोपर्यंत आम्ही आहोत, तोपर्यंत नागरिकांनी सुरक्षित समजावे की एनडीआरएफ महाराष्टाकडे आहे, असे एनडीआरएफचे डेप्युटी कमांडंट अलोककुमार यांनी सांगितले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे ट्रस्टच्या १२७ वर्षानिमित्त आयोजित गणेशोत्सवात  एनडीआरएफ च्या जवानांनी दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी एनडीआरएफच्या सर्व जवानांनी गणरायाला अभिषेक करण्यासोबत आरती देखील केली. रविवार सुटीचा दिवस असल्यामुळे गणेशभक्तांनी दर्शनासाठी मोठया प्रमाणात गर्दी केली होती. तसेच गणरायाला लाडूंचा भोग चढविण्यात आला होता.
गणरायासमोर केरळमधील चंडा वाद्याचे वादन कलाकारांनी केले. यावेळी गणरायाला या कलाकारांनी वादनातून नमन केले. गणरायाचे दर्शन घेण्याकरीता माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार, जय पवार, बिग बॉस मराठीतील स्पर्धक अभिजीत बिचुकले, अभिनेता श्रेयस तळपदे, नेहा गद्रे, तेजस्विनी पंडित, निलेश साबळे, आमदार नितेश राणे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली.