स्वर्गीय लोकशाहीर विश्वासराव साळुंके यांच्या 21 व्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन

Share this News:

जे.डी. साळुंके

महाराष्ट्रा, 2 जून 2020 : दिनांक 2 जून 1999 चा तो दिवस शेवाळीकरांनाच नव्हे तर उभ्या महाराष्ट्रातील लोककलेच्या रसिक कलावंतांना काळा दिवस ठरला. कलेचा सतत वाहणारा झरा अचानक थांबला आणि दुर्दैवाने एका महान कलावंतांचा जीवनप्रवास संपला.

ज्या माणसाने उभे आयुष्य समस्त मानवजातीच्या मनाचे मनोरंजनचं नव्हे तर समाजाच्या लोक कल्याणकारी उपक्रमांचे प्रबोधन करण्यासाठी अनेक साहित्याची अभ्यासपूर्वक निर्मिती करून मराठवाड्यातच नव्हे तर संपूर्ण प्रांतात, परप्रांतात स्वतःच्या शाहिरी आवाजाने आपल्या नावाचा पर्यायाने जन्मभूमीच्या नावाचा डंका वाजवत लौकिक वाढवला . ‘ पैशाला अनेक वाटा ‘ या स्वलिखित लोकनाट्याने रसिक मनाला वेड लावले. विहीर चोरीला गेली, सगळं धाब्यावर बसवलं, यासारख्या अनेक नाटकांच्या पुस्तकाने मनामनाला वाचनाचं वेड लावलं.

असे एक ना अनेक साहित्याची त्यांनी निर्मिती केली. हे सर्व करत असताना आई वडिलांची प्रेरणा त्यांच्या पाठीशी निश्चितच होती आणि त्यांच्या कर्तव्य काळात त्यांच्या धर्मपत्नी श्रीमती कमलताई साळुंके यांचे मोलाचे योगदान त्यांना त्यांच्या यशप्राप्ती साठी लाभले.

खान्देशातील एका सामान्य कुटुंबात जन्म घेतलेला एक मानवतावादी शिक्षक पुण्यकर्म करत आपल्या उपजत गुणांनी असामान्य दर्जा निर्माण करतो, हे भाग्य या मातीचेच मानावे लागेल . आज ते जरी आपल्यात नसले तरी त्यांचे नाव अमर आहे .

‘मरणात खरोखर जग जगते ! ‘ असे म्हणतात परंतु अशा महान माणसाच्या दुर्दैवी मरणानंतर आपणही काही देणे लागतो. फक्त सृतिदिनानिमित्त श्रद्धांजली व्यतिरिक्त जन्मभूमीत त्यांचे कोणतेच ऋण आपण फेडू शकत नाही, ही खंत प्रत्येक मनामनात आहे . जाणकरांकडून या विषयाची गंभीरपणे दखल होणेसाठी मनात आलेला अल्पसा विचार व्यक्त करत आहे .कारण एका खान्देशात जन्मलेल्या कलाकाराच्या स्मृती गेल्या एकवीस वर्षांपासून मराठवाड्यातील औरंगाबाद शहरात दर वर्षी स्व.लोकशाहीर विश्वास साळुंके प्रतिष्ठान व गरवारे कम्युनिटी सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने लोककलेचा वारसा नवीन पिढीकडे सोपवणे या प्रमुख उद्देशाने शिबिराचे आयोजन अखंडपणे चालु आहे. त्यात त्यांनी निर्माण केलेल्या साहित्याचा परिचय रसिकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न बालकलाकारांकडून केला जातो. व त्यांच्या आठवणींना उजाळा देत , स्मृती जाग्या ठेवल्या जातात.

परिसरातील सार्वजनिक ठिकाणी अथवा शहरातील मुख्य मार्गांवर त्यांचे नाव देऊन त्यांचे ऋण व्यक्त केले आहे एकूण 70 लोकनाट्य लिहिणाऱ्या या लेखक कलावंताची मराठवाड्यात आजही रंगदेवतेचे पुजारी पूजा करतात त्यांच्या नावाने दिलेल्या पुरस्काराचे दरवर्षी विविध क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थी सुवर्ण पदकाचे मानकरी ठरतात हे त्यांचे मरणानंतरचे जगणे आहे आणि जेथे कलेचा जन्म झाला त्या भूमीत अशा सुपुत्राचा जन्म झाला हे खरोखर भाग्यच म्हणावं लागेल.

खरे म्हणजे शेकडो वर्षांच्या नाट्यपरंपरेचा वारसा प्राप्त असलेल्या गावात अशा महान विद्वान माणसाच्या जन्मभूमीत स्मारक उभे करण्याचा मानस जनमाणसात निर्माण झाला पाहिजे आणि एखाद्या सार्वजनिक ठिकाणी या लोककलावंतांचे नाव देऊन गावाची आणि गावविचाराची निश्चितच उंची वाढेल आणि शेवाळी चे नाव राष्ट्रीय पातळीवर एक वेगळी ओळख म्हणून निश्चितच संबोधिले जाईल असे मला वाटते . आणि मृतात्म्यास हीच खरी आदरांजली ठरू शकेल.

शाहीर विश्वास साळुंके अमर रहे !