कोरोनाच्या काळातील मास्कचा वाढता वापर आणि त्याची योग्य ती विल्हेवाट लावणे आपली जबाबदारी

How to wear mask and dispose it properly

गायत्री क्षीरसागर

पुणे,  २८ जून २०२०: “विथ ग्रेट पॉवर कम्स रेस्पॉन्सिबीलीटी” ही इंग्रजीमधील अत्यंत प्रचलित म्हण आहे, आणि हे तंतोतंत खरं देखील आहे. ज्यावेळी तुमच्याकडे एखादी शक्ती असते तेंव्हा तिचा योग्य / सदुपयोग करण्याचा विचार करणे अत्यंत गरजेचे आहे.

आज ह्या लेखाची  सुरवात ‘ह्या’ म्हणी पासून करण्याची गरज वाटण्याचं प्रमुख कारण म्हणजे कोरोना विषाणू पासून स्वतःच्या बचावासाठी, तसेच इतरांनां संसर्ग होऊ नये आणि कोरोना विषाणूचा प्रसार शक्य तेवढा आटोक्यात राहावा ह्यासाठी आपण सर्व जण मास्क वापरत आहात. WHO ने देखील ‘मास्क’ वापरणे किती महत्वाचे आहे हे नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केले आहे ( जून  4).

अगदी ‘कापडी मास्क‘ का होईना पण शक्य तेवढा सर्वानी त्याचा वापर करावा,  ह्याचा पुरस्कार गेल्या कित्येक दिवसांत, सर्वच स्थरातून केला जात आहे. त्यात अनेक डिझायनर मास्क, फॅशनेबल मास्क किंवा अगदी घरात उपलब्ध असलेल्या स्वच्छ कपड्यापासून किंवा शर्ट पासून मास्क कसा बनवावा, ह्याचे ट्युटोरिअल / व्हिडियो सोशल मीडियाद्व्यारे प्रसिद्ध केले जात आहेत. हे सर्व पाहून नक्कीच कौतुक करावेसे वाटते.

अगदी सुरवातीच्या काळात, जेंव्हा पहिला LOCKDOWN घोषित केला, तेव्हा आपल्याकडची परिस्थिती जरा बरी होती, नाहीतर परदेशांमध्ये दुकानांमधील मास्क किंवा सॅनिटायझर मिळावे, ह्यसाठी होणारी झुंबड पाहून अक्षरश: कीव येत होती. आपल्याकडे काही अंशात लोकांनी सुरवातीला सर्जिकल मास्क किंवा N-९५ मास्कचे साठे करण्यास सुरवात केली होती. अनेक तज्ञ, डॉक्टर आणि अधिकारी ह्यांच्या विनंतीचे व्हिडीओ वायरल झाल्यावर अशा मास्कची खरी गरज ही ‘कोरोना वॉरियर्स’ ना असल्याचे लोकांना उमजू लागले, आणि त्यानंतर जरा परिस्थितीत फरक पडला. परुंतु आजही अनेक लोक सर्जिकल किंवा डिस्पोझेबल मास्क वापरताना दिसून येते.

ह्या महिन्यात अनेक ठिकाणी LOCKDOWN हे शिथिल करण्यात आले, त्यामुळे बऱ्याच ठिकाणी आता गर्दी होताना दिसत आहेत. बरेच लोक मास्क वापरताना दिसून येत आहेत, परुंतु काही जण फक्त पोलिसांची भीती किंवा बाहेर पडताना मास्कची सक्ती ह्याच विचारांनी मास्क वापरत असताना दिसतात. मास्क फक्त देखावा म्हणून घालतात, किंबहुना बाहेर अनेक जणांच्या गळयाभोवती हे मास्क लटकलेले दिसतात. क्वचितच कोणाचं लक्ष गेलं, किंवा उगाच रोखून पाहिल तर हा ‘मास्क’ लोक वर उचलतात, आणि पुन्हा मग पहिले पाढे पंचावन्न. अगदी किराणा दुकानात असो किंवा भाजीपाला घेताना, कित्येक दिवसात असा प्रकार वारंवार होताना पाहून  ह्यावर लिहावेसे वाटले.

लोकांना मास्कचे खरे महत्व किती समजले आहे का ह्यावर आजही प्रश्न चिन्ह आहे . लोकांनी स्वतःच्या आरोग्यासोबत इतरांचा देखील विचार करणं महत्वाचं आहे. सरकार वेळोवेळी, गरज असेल तरच घराबाहेर पडा, सतत मास्कचा आणि सॅनिटायझरचा वापर करा, कोठेही हात लावू नका आणि लावल्यास तो साबणाने स्वच्छ धुवा, हे आणि असे अनेक सल्ले देत आहेत आणि तशा  सूचना देखील प्रसिद्ध करत आहेत परंतु आपल्या देशात जिथे अनेक लोकांना अगदी जेवण्यापूर्वी हात धुण्याची सवय नसते, तिथे मास्क किंवा वारंवार हात धुण्याच्या सवयी अंगवळणी पडायला थोडा  वेळ लागेल हे समजू  शकते . परुंतु जर ‘मास्क’ ही आपल्या जीवनासाठी ‘पॉवर’ असेल, तर त्यासोबत ते वापरत असताना योग्य ती खबरदारी घेणं देखील आपली जबाबदारी आहे, हे आपण सर्वांनी लक्षात घेणं अत्यंत महत्वाचं आहे.

WHO च्या नवीन नियम प्रणालीनुसार हेल्थ केअर वर्कर्स (आरोग्य कर्मचारी) किंवा रिस्क ग्रुप आणि COVID – पॉसिटीव्ह पेशन्टस्स्, किंवा त्यांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींनी सर्जिकल किंवा मेडिकल मास्क वापरावे असे सुचविण्यात आले आहे. तसेच इतर लोकांनी खबरदारी म्हणून कापडी किंवा नॉन-सर्जिकल / मेडिकल मास्कचा वापर करावा असे देखील सुचविण्यात आले आहे.

माक्स वापरताना घ्यावयाची खबरदारी : 

१) अगदी गरज असल्यास घराबाहेर पडा. लहान मुले, गरोदर स्त्रिया, डायबिटीस किंवा फुफ्फुसाचे विकार किंवा ह्यदयविकार, कॅन्सर असणारे पेशन्ट किंवा  वयोवृद्ध व्यक्ती ह्यांनी शक्यतो घराबाहेर जाणे टाळा.

२) घराबाहेर जाताना चेहऱ्यावर न विसरता मास्क लावून घराबाहेर पडा किंवा सोबत १ किंवा २ कापडी मास्क, एका बॅगमध्ये घेऊन जा.

३) काही जण आता ऑफिसच्या कामासाठी घराबाहेर पडत असतील किंवा सार्वजनिक ठिकाणी जात असतील तर निदान मास्क लावताना आपण इतरत्र कोठेही हात लावणार नाही ह्याची खबरदारी घ्यावी, तसेच अनावधानाने मास्कला  हात लागताच, तो मास्क बदलावा किंवा हात सॅनिटायझर किंवा साबण आणि पाण्याने स्वच्छ धुवावेत.

४) बाहेरून घरी परत आल्यावर, अंघोळ करून, कपडे आणि मास्क स्वच्छ धुवूनच इतरत्र बसावे. ह्यामुळे तुमच्या कुटुंबियांना त्रास होणार नाही आणि धोकादेखील टळेल.

५) तसेच घराबाहेर पडत असताना स्वतःची पाणी बॉटल घेऊन जाणे आता गरजेचे आहे.

६) जर तुम्ही डिस्पोझेबल मास्क किंवा सर्जिकल मास्क वापरात असाल तर असे मास्क ‘बायो-हझार्ड’ म्हणून विचारात घेतले जावे आणि त्याची योग्य ती विल्हेवाट करण्यात यावी. अनेक जण रस्त्यांवर किंवा कचऱ्याच्या पेटीत हे मास्क टाकताना दिसत आहेत. परुंतु ह्यामुळे सफाई कामगार किंवा भटकी कुत्री किंवा इतर प्राण्यांना ह्याचा धोका आहे, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. असे मास्क ब्लिच सोल्युशन मध्ये भिजवून  किंवा निदान ते जाळून नष्ट करावेत.

७) शक्यतो कापडी मास्कचा वापर करावा कारण ते योग्य पद्धतीने आणि वेळेच्या वेळी धुता येतात.

 ८) तसेच N -९५ मास्क किंवा त्याला पर्याय म्हणून बाजारात अनेक मास्क उपलब्ध आहेत. परंतु हे सर्व मास्क हे ‘वन टाइम  युझ किंवा अगदी नावाप्रमाणे ‘डिस्पोझेबल‘ म्हणजे फक्त एकदाच वापरून फेकले जाणारे आहेत,  हे लक्षात घेणे अत्यंत गरजेचे आहे. काही लोक हे मास्क महाग असल्या कारणाने किंवा निदान दोन- तीन दिवस का होईना वापरता येतील ह्या विचाराने, मास्क तेच तेच मास्क पुनः-पुनः  वापरत आहे, परुंतु हे अत्यंत चुकीचे आहे.

९) असे डिस्पोझेबल मास्क लवकर ओले होतात, फाटतात  किंवा धुळीने किंवा सतत वापराने खराब होतात. असे निदर्शनास आल्यास असे मास्क ताबडतोब बदलावे. नाहीतर इन्फेक्शनचा धोका अधिक वाढतो.

१०) अगदीच तुम्हला जर कापडी मास्क घालताना भीती वाटत असेल आणि ते किती संरक्षण देतील ह्याबाबत शंका असेल तर आता फेस शिल्ड / प्लास्टिक चे आवरण देखील त्यावर परिधान करू शकता, घरी असलेल्या प्लास्टिक फोल्डर किंवा अगदी बॉटल्स पासून असे मास्क बनविण्याच्या ट्युटोरिअल्स किंवा व्हिडीओ उपलब्ध आहेत. तसेच असे फेस शिल्ड पारदर्शक आणि प्लास्टिकचे असल्याने ते स्वच्छ धुता देखील येतात.

११) घरातील प्रत्येक व्यक्तीने स्वतःच्या जबाबदारीने स्वतःचाच मास्क घालावा, हे मास्क शेअर करू नये किंवा घरातील एका व्यक्तीने वापरलेला मास्क इतर व्यक्तींनी वापरू नयेत.

(लेखिका – गायत्री क्षीरसागर ह्यांनी ‘नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ व्हायरोलॉजी’ (ICMR – NIV, Pune), ह्या संस्थेमधून विषाणूशास्त्र (Virology) ह्या विषयात पदवी संपादन केली आहे, आणि  त्या गेले अनेक वर्ष ‘सायन्स कम्युनिकेशनआणि पब्लिक एंगेजमेंट ‘ ह्या क्षेत्रात कार्यरत आहेत.)