पुणे व्यापारी महासंघाने आपला अडीअडचणी संदर्भात सविस्तर प्रस्ताव प्रशासनास सादर करावा – विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर

Support Our Journalism Contribute Now

पुणे, दि.21 पुणे व्यापारी महासंघाने आपल्या अडीअडचणी संदर्भात सविस्तर प्रस्ताव प्रशासनास सादर करावा, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी पुणे व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत दिल्या. याबाबत जिल्हाधिकारी तसेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त यांच्या समवेत या प्रस्तावावर बैठक घेवून सर्वांगीण बाबीचा विचार करुन मार्ग काढण्यात येईल, असेही विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर सांगितले.
        कोरोना संसर्गजन्य आजाराबाबत व्यापारी संघटना यांच्यासोबत विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका, सचिव महेंद्र पितळीया, पुणे मर्चंट चेंबरचे पोपटलाल ओसवाल, पुणे टिंबर संघटनेचे रतन किराड, पुणे इलेक्ट्रीकल संघटनेचे सुरेश जेठवाणी, पुणे टाईल्स सॅनिटरी संघटनेचे जगदीश पटेल तसेच इतर संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
          पुणे व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांच्याशी भेट घेवून त्यांनी चर्चा केली. व्यापारी महासंघाच्यावतीने सादर केलेल्या मागण्या विचारात घेता विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर म्हणाले, पुणे व्यापारी महासंघाने सर्वांना सोयीस्कर ठरेल याचा विचार करुन एकत्रित प्रस्ताव तयार करावा. त्यामध्ये प्रामुख्याने कामगारांच्या राहण्याच्या सोईबरोबरच त्यांना कामाच्या ठिकाणी येण्या-जाण्याकरीता लागणारी वाहतूक व्यवस्था, पिण्याचे पाणी, लागणारी वीज, अग्निशामक यंत्रणा, मालाची वाहतूक, मालाची साठवण क्षमता, मालासाठी लागणारी गोदामे इत्यादी बाबीचा विचार करावा. मालाची वाहतूक करतांना रहदारीचा प्रश्न निर्माण होणार याची काळजी घेण्यात यावी, अशा सूचनाही विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी यावेळी केल्या.
          जिल्हाधिकरी श्री. राम म्हणाले, आपल्या मागण्या रास्त आहेत. कोरोना सारख्या महामारीच्या वेळी अत्यावश्यक सेवेत अडथळा निर्माण होणार नाही, यांची संपूर्ण काळजी प्रशासनाच्यावतीने घेतली जात आहे. तसेच आगामी काळात पुणे शहरात वाढत जाणारी लोकसंख्या तसेच गर्दीची ठिकाणे लक्षात घेता पुणे व्यापारी महासंघाने केलेल्या मागण्यांच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाच्या वतीने जागा उपलब्ध करुन देण्यास सर्वोतोपरी प्रयत्न केले जाईल, असेही श्री. राम यांनी सांगितले.
        पुणे व्यापारी महासंघाच्या वतीने आपल्या अडीअडचणीच्या अनुषंगाने शहरातील मध्यवस्तीतील बाजारपेठ शहराबाहेर हलविण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, कन्व्हेक्शन सेंटर या प्रमुख मागण्याबाबतचे निवेदन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांना दिले. ‘कोरोना’मुळे टाळेबंदीच्या काळात पुणे शहरातील दुकाने बंद असल्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. कामगारांचे वेतन, दुकानांचे भाडे, वीजबील यासारखे प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे, असेही असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
Punekar News is now on Telegram. For the latest Pune, Pimpri Chinchwad PCMC news, Like our Facebook Page, follow on Twitter and Instagram and also subscribe to Punekar News on Telegram.