प्लास्टिक निर्मूलनासाठी पुणेकरांना एक लाख कापडी पिशव्या वाटणार
27/8/2019, पुणे : माय अर्थ फाउंडेशन व दीपाली भोसले सय्यद चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने प्लास्टिकमुक्त भारताचे स्वप्न साकारण्यासाठी एक लाख कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात येणार आहे. ‘एक कापडी पिशवी घ्या आणि एक किलो प्लास्टिक द्या’ हा उपक्रम हाती घेण्यात आला असून, प्लास्टिक वापराच्या बंदीबाबत जनजागृतीही केली जाणार आहे. या उपक्रमात लायन्स क्लब इंटरनॅशनल, महाएनजीओ फेडरेशन या संस्थांचाही सहभाग असणार आहे, अशी माहिती माय अर्थ फाउंडेशनचे अध्यक्ष अनंत घरत, अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी ललित राठी, लायन्स क्लबचे राज मुछाल तसेच ‘महाएनजीओ’चे शेखर मुंदडा आदी उपस्थित होते.
अनंत घरत म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून प्लास्टिक पिशव्यांचा वापर करू नये, असे आवाहन केले होते. त्याला अनोख्या पद्धतीने प्रतिसाद देण्यासाठी माय अर्थ फाऊंडेशन व दीपाली भोसले सय्यद चॅरिटेबल ट्रस्टने पुढाकार घेतला आहे. टप्प्याटप्प्याने पुणेकरांना प्लास्टिककडून कापडी पिशव्या वापरण्यास प्रोत्साहित करायचे आहे. त्यासाठी एक कापडी पिशवीच्या बदल्यात घरातील एक किलो प्लास्टिक कचरा घेतला जाणार आहे. याशिवाय प्लास्टिकच्या वापरावर अभ्यासही केला जाणार आहे. प्लास्टिक कचरा ही फार मोठी समस्या जरी असली, तरी त्या समस्येवर फक्त पर्यायच नाही, तर त्यातून मोठ्या प्रमाणात व्यवसाय निर्मिती, रोजगार आणि बरेच काही असे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येत आहे. कचर्याला आम्ही लक्ष्मी म्हणून संबोधतो. एक पाऊल, वसुंधरेसाठी, प्लास्टिक मुक्त पर्यावरणासाठी हा प्रयत्न आणि सुरवात आहे. स्वच्छ सर्वेक्षणात पुण्याचा घसरलेला क्रमांक वाढविण्यासाठी या माध्यमातून जनजागृती हि केली जाणार आहे.
दीपाली सय्यद म्हणाल्या, पुणे हे विद्येचे माहेरघर असून, स्वच्छतेच्या बाबतीतही भारतात अग्रेसर असावे, अशी इच्छा आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून जनजागृती करणे आणि कापडी पिशवीचा जीवनातील वापर वाढावा ही इच्छा आहे. हा उपक्रम लोकांमध्ये पोहोचविण्यासाठी गणेशोत्सवाच्या काळात पुणे शहरात पथनाट्यांचे प्रयोग केले जाणार आहेत. प्लास्टिक हा अविघटनशील पदार्थ आहे. प्लास्टिकच्या वापरामुळे मानवासह जनावरे, झाडे, जमीन यासह पाण्याचे प्रदूषण होते. हे टाळण्यासाठी आपण कापडी पिशवीचा वापर करणे अतिशय गरजेचे आहे. त्याच भावनेतून कापडी पिशवीच्या वापरला नागरिकांनी प्राधान्य द्यावे, यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे. प्लास्टिक वापरावर बंदीबरोबरच त्याच्या फायद्या-तोट्यांविषयी देखील या उपक्रमात माहिती दिली जाणार आहे.
ललित राठी यांनी सांगितले की, संकलित प्लास्टिक कचर्याचे संशोधन करून त्यातुन कोणते प्लास्टिक योग्य कोणते अयोग्य आहे, याचा अहवाल एन्व्हायरमेंट क्लब ऑफ इंडियाच्या माध्यमातून सरकारला पाठविण्यात येणार आहे. एक कापडी पिशवीच्या बदल्यात एक किलो प्लास्टिक द्या असे आवाहन आम्ही करीत आहोत आणि त्यामार्फत 100 टन प्लास्टिक गोळा करण्याचा आमचा प्रथमदर्शी मानस आणि ध्येय आहे. प्लास्टिकबद्दल समाजात समज-गैरसमज असल्यामुळे प्लास्टिकच्या वापरासंदर्भी सर्व उपभोगत्याना जाणीव होणे गरजेचे आहे. कचर्याचे वर्गीकरण झाल्यानंतर त्याचे पुढे काय होते जाची जनजागृती होणे अत्यंत आवश्यक आहे.
लायन्स क्लबचे राज मुछाल म्हणाले हा उपक्रम पुणे शहरातील प्रत्येक शाळा , महाविद्यालयात नेण्याचे काम लायन्स तर्फे केले जाईल. तसेच लायन्सच्या वतीने 5000 कापडी पिशव्या या उपक्रमात दिल्या जातील.