कॉसमॉस बँक निवडणुकीत सहकार पॅनेलला वाढता प्रतिसाद

Share this News:

20/12/2019, पुणे : कॉसमॉस बँक विद्यमान संचालक प्रणित सहकार पॅनेलमधील उमेदवारांनी याआधी उत्तम अशी कामगिरी बजावली आहे. आम्ही प्रचारात आघाडी घेतली असून, आमचे संपूर्ण सहकार पॅनेल या पंचवार्षिक निवडणुकीत (२०२०-२०२५) देखील घवघवीत यश मिळवेल, असा विश्वास सहकार पॅनेलचे प्रणेते कृष्णकुमार गोयल व माजी सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

मागील पाच वर्षांमध्ये बँकेला काही आव्हानांचा सामना करावा लागला. पण अनुभवी संचालक मंडळ, भागधारकांचा सार्थ विश्वास, खातेदार व सर्व हितचिंतकांच्या बळावर या सर्वातून बँक सुखरूपपणे बाहेर पडली आहे. आर्थिक स्तरासह सर्व उर्वरित क्षेत्रांमध्ये बँक उत्तम कामगिरी करते आहे. ही कामगिरी अधिक उंचावण्याच्या दृष्टीने सहकार पॅनेलने बँकेचे मोठ्या टप्प्यावरील प्रगतीचे ध्येय ठेवले आहे, ज्यामध्ये बँकेची उलाढाल ४० हजार कोटींपर्यंत नेणे, बँकेच्या गुणवत्तापूर्ण कामकाजासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व कर्मचारी प्रशिक्षणावर भर देणे, बँकेच्या तांत्रिक सुरक्षिततेवर अधिक लक्ष केंद्रित करणे, तांत्रिक व आर्थिक सुरक्षितेची हमी देणाऱ्या इतर उपाययोजनांची अंमलबजावणी करणे, भागधारकांना लाभांश देण्याच्या दृष्टीने नियोजनावर भर देणे आदी गोष्टींचा समावेश असणार आहे.

सर्व भागधारक, खातेदार, कर्मचारी, अधिकाऱ्यांचा विश्वास अनुभवी संचालक मंडळीच्या बळावर बँकेपुढील आव्हाने समर्थपणे पेलून बँकेस नव्या उंचीवर नेण्याचा सहकार पॅनेलचा निर्धार आहे. त्यासाठी रविवार, (२२ डिसेंबर २०१९) रोजी बँकेच्या नवीन कार्यकारिणीच्या निवडीसाठी भागधारक व मतदारांनी सहकार पॅनेलच्या `टेलिफोन` या चिन्हावर मतदान करून पॅनेलच्या सर्व तेरा उमेदवारांना निवडून द्यावे, असे आवाहन सहकार पॅनेलचे प्रणेते उद्योजक कृष्णकुमार गोयल व माजी सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी केले आहे.

सर्वात अनुभवी संचालक सहकार पॅनेलचे उमेदवार
मागील संचालक मंडळातील बहुतांश अनुभवी व तज्ज्ञमंडळी यावेळी सहकार पॅनेलमध्ये उमेदवार म्हणून सोबत आहे. आर्थिक क्षेत्रातील या सर्व अनुभवी उमेदवारांचा एकत्रित अनुभव शंभर वर्षांपेक्षा अधिक आहे. याचाच अर्थ आमच्या पॅनेलमध्ये अनुभवी व आपपल्या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी उमेदवार आहेत. त्यात विशेष उद्योजक कृष्णकुमार गोयल, माजी सहकार आयुक्त व राष्ट्रीय पातळीवर गौरवप्राप्त माजी ज्येष्ठ प्रशासकीय अधिकारी चंद्रकांत दळवी, अॅड. जयंत शालीग्राम, अॅड. श्रीपाद पंचपोर, अॅड. जितेंद्र शहा, गोविंद क्षीरसागर, ज्येष्ठ पत्रकार व मिडिया अध्यापक राजीव साबडे यांच्या अनुभवाचा फायदा बँकेला मिळणार आहे.

मान्यवर पुणेकरांसह राज्यभरातून सक्रिय पाठिंबा
या निवडणुकीत प्रचारात सहकार पॅनेलने आघाडी घेतली असून, पुणे-पिंपरी चिंचवडसह सर्व राज्यभरातून सहकार पॅनेलच्या आम्ही आपल्या पाठीशी आहोत, असा संदेश मिळतो आहे. पुण्याचे खासदार गिरीष बापट, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, राज्यसभा खासदार अमर साबळे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार भीमराव तापकीर, आमदार सिद्धार्थ शिरोळे, आमदार मुक्ता टिळक, आमदार श्रीमती माधुरी मिसाळ, माजी आमदार मेधा कुलकर्णी, काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौर उषा उर्फ माई मनोहर ढोरे, खडकी कँन्टोमेंट बोर्डाचे उपाध्यक्ष दुर्योधन भापकर, आळंदी नगरपालिकेच्या अध्यक्षा वैजयंती उमरगेकर-कांबळे, पद्मभूषण डॉ. के.एच. संचेती, अॅड. एस.के. जैन, शांतीलाल मुथा, पुणे सराफ व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. फत्तेचंद रांका, विठ्ठल मणियार, पी.एन.गाडगीळचे सौरभ गाडगीळ, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे, वेदाचार्य मोरेश्वर घैसास गुरूजी, व्हीआयटी युनिव्हर्सिटीचे राजकुमार अग्रवाल आदी मान्यवरांनी सहकार पॅनेलला सक्रिय पाठींबा दिला आहे.
….
Photo Caption : पत्रकार परिषदेत डावीकडून डॉ. स्मिता जोग, ऍड. जयंत शाळीग्राम, ऍड. श्रीपाद पंचपोर, कृष्णकुमार गोयल, चंद्रकांत दळवी, गोविंद क्षीरसागर.